शाबासकीची भूक

        

(चित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)

चांगल्या कामाला शाबासकी आणि चुकीला शिक्षा हे व्यवस्थापनशास्त्राचे मूलभूत तत्व आहे. शाबासकीने अजून चांगले काम करण्याचा हुरुप वाढतो तर शिक्षेमुळे चुकीला पायबंद घालता येतो. त्यामुळे हे तत्व सर्वत्र सर्रासपणे वापरले जाते. यातील शाबासकीची भूक माणसाला सदैव असते. या भुकीमुळे चांगले काम करण्यासाठी प्रवृत्ती होत असते. याबाबतीत मनात काही विचार येऊ लागले. बक्षीस अथवा शाबासकी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. राजेशाहीच्या काळात सोने-नाणे, दागिने, जमीन, पदवी इत्यादी गोष्टी देऊन शाबासकी दिली जात असे. रोख रक्कमदेखील देण्याची पद्धत होती.


       साधारणपणे आपल्या माणसांच्या उपस्थितीत कौतुक झाले की त्याचा जास्त आनंद होतो. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा सरकारच्या आणि इतर संस्था संघटना यांच्यावतीने घेतल्या जातात. त्याचे पारितोषिक म्हणून रक्कम , चषक अथवा पदक, प्रशस्तीपत्र देण्याची पद्धत आहे. काही वर्षांपूर्वी एका स्पर्धात्मक उपक्रमांची चर्चा चालू असताना या स्पर्धेतील विजयी व्यक्तीला कोणते पारितोषिक देता येईल यावर आम्ही विचार करीत होतो. त्यावेळी रोख रकमेऐवजी अन्य काही देता येईल का अशी चर्चा करू होती. या चर्चेदरम्यान उपस्थित एका सहकाऱ्यांनी त्यांचे निरीक्षण सांगितले ते म्हणाले , "ग्रामीण भागात एखादी स्पर्धा झाली आणि त्याचा पारितोषिक वितरण समारंभ गावात न होता तालुका, जिल्हा अथवा राजधानीच्या ठिकाणी काही वेळा असतो. अशा पारितोषिक वितरणासाठी मोठ्या संख्येने संबंधित गावकरी येऊ शकत नाहीत. म्हणून शाबासकीचे फार महत्व ग्रामीण भागातील व्यक्तींना वाटत नाही. त्याऐवजी गावात अथवा पंचक्रोशीत एखाद्या यात्रेच्या निमित्ताने या व्यक्तीला टोपी , नारळ देऊन सत्कार झाला तर त्याचे महत्त्व अशा व्यक्तीला जास्त मोलाचे वाटते. कारण अशा सत्काराच्यावेळी त्या व्यक्तीचे कुटुंबीय, गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात." आपल्या माणसांच्या उपस्थितीत झालेला छोटासा सत्कार देखील अशा माणसांना फार महत्त्वाचा वाटतो त्यामुळे पारितोषिक वितरण गावात होईल असे बघावे लागते.

        शाबासकीचा उपयोग व्यवस्थापनशास्त्राच्या दृष्टीने फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात असे अनेक प्रसंग सांगता येतील. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सोबतच्या माणसांमध्ये कवींद्र परमानंद गोविंद नेवासकर हे देखील होते. या कवीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेशानुसार संस्कृत भाषेमध्ये 'शिवभारत' नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. यात महाराजांचे सुरुवातीच्या काळातील चरित्र लिहिण्यात आले आहे. या कवींद्राला नर व मादी अशी हत्तींची जोडी महाराजांनी भेट म्हणून दिल्याचा तत्कालीन राजस्थानी भाषेतील कागदपत्रांमध्ये उल्लेख आहे.

      कपटी औरंगजेबाच्या कैदेमध्ये शिवराय सापडले. अत्यंत चतुराईने महाराज त्यांच्या सोबतची सगळी माणसे आणि जनावरे यांना सोडवून परत स्वराज्यात आले. या प्रसंगानंतर महाराजांनी २-३ वर्षांनी मोठ्या प्रमाणावर स्वराज्याचा विस्तार करण्याचे ठरवले. 'आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे' असे म्हणून सुभेदार तानाजी मालुसरे यांनी सिंहगड तर घेतला परंतु 'गड आला पण सिंह गेला' अशी परिस्थिती झाली. यानंतर महाराजांनी कामगिरीच्या आधीच बक्षीसे पारितोषिके देण्याची योजना सुरू केली. आपल्या सैन्यासह ज्यावेळी त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या फोंडा किल्ल्यावर चढाई सुरू केली तेव्हा गडामधूनदेखील तिखट प्रतिकार होऊ लागला. मावळ्यांना विजय मिळेना. तेव्हा महाराजांनी सोन्याची वजनदार कडी मोठ्या संख्येने तयार करून घेतली. सर्व सैन्याला एकत्रित बोलावून जो फोंडा किल्ल्याच्या तटाला शिड्या लावून तटावर चढून लढाई करण्याची तयारी दाखवील अशा प्रत्येकाला सोन्याचे कडे लढाई आधीच पारितोषिक म्हणून दिले. अशा सर्व पराक्रमी वीरांनी मोठा पराक्रम करून फोंडा गड महाराजांना मिळवून दिला. यात स्वराज्याच्या सैनिकांची मोठी प्राणहानी झाली. पण महाराजांच्या शाबासकी खातर मावळ्यांनी प्राणांची बाजी लावली असे विलक्षण उदाहरण इतिहासात वाचायला मिळते.

          स्वतंत्र भारतात ज्यांना एकाचवेळी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला अशा दोघांचा आयुष्यातील प्रसंग आठवले. पहिला आहे प्रा.सी.एन.आर.राव या ज्येष्ठ शास्त्रज्ञांच्या आयुष्यातील. त्यांनी एका मुलाखतीत "चांगली कामगिरी केली तरी माझे गुरु नॉट बॅड एवढेच म्हणायचे पण तेच मला मोलाचे वाटे." दुसरा प्रसंग सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यातील आहे. त्यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर हे बॅटिंग सुरू करताना तीनही स्टंपवर नाणी ठेवत. जर स्टंप आऊट न होता खेळ पूर्ण केला तर ती नाणी त्या खेळाडूला मिळत असत. पण ही मोठी प्रेरणा सचिन तेंडुलकर यांच्यासाठी होती.

         एकूण काय तर माणसाची शाबासकीची भूक मोठी असते. आपल्या माणसांपुढे झालेली मिळालेली शाबासकी ही प्रगतीसाठी महत्त्वाची ठरते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या युगपुरुषाने विश्वास ठेवून कामगिरीच्या आधीच दिलेली शाबासकी तर पृथ्वी मोलाची असते.

सुधीर गाडे पुणे 

(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. आपल्या माणसांकडून मिळणारी शाबासकी प्रगतीसाठी महत्त्वाची ठरते, यासाठी आपण दिलेले सर्व उदाहरणे हे दर्शवतात की शाब्बासकी पृथ्वी मोलाची आहे..... सुदंर लेखन केले आहे सर तुम्ही..... धन्यवाद सर...

    ReplyDelete
  2. दोन शब्द आपुलकीचे आणि दोन शब्द शब्बासकीचे.. मिळाल्यामुळे शौर्य पराक्रम गाजवल्याचे अगणित उदाहरण आहेत, एकूण काय आपण केलेल्या कामाची दखल घेतली जाणे महत्त्वाचे.. नेहमीप्रमाणे सुंदर लेखन

    ReplyDelete
  3. डॉ विकास इनामदार यांनी लिहिलेले आहे.
    सार्वजनिक ठिकाणी कौतुक केले पाहिजे. टीका खाजगीत केली पाहिजे. हे मूलभूत व्यवस्थापन तत्त्व आहे जे व्यवहार करताना वरिष्ठांनी पाळले पाहिजे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी