शिक्षेचे नाना प्रकार

       शाबासकीप्रमाणेच शिक्षेलाही महत्त्व आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा बजावल्या गेल्या अमलातही आणल्या गेल्या. मध्ययुगीन काळात पैशांचा दंड करणे, घरावर जप्ती आणणे, कोठडीत ठेवणे, चाबकाचे फटके देणे, हात किंवा पाय तोडणे, गुलाम करणे, शिरच्छेद करणे, कडेलोट करणे, जाळून मारणे, हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारणे, तोफेच्या तोंडी देणे यासारख्या शिक्षा होत असत. जोपर्यंत चूक , गुन्हा होत राहील तोपर्यंत शिक्षा होतच राहणार. शिक्षांची ही काही उदाहरणे.


          (टॅंटलसच्या शिक्षेचे चित्र इंटरनेटवरून साभार)

         ग्रीक संस्कृती जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आज ती नामशेष होऊन केवळ संग्रहालये आणि पुस्तकात ही संस्कृती उरली आहे. ग्रीक पुराण हे जगातील प्राचीन पुराणांपैकी एक आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षांच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्या पुराणकथांमधील सर्वात शक्तिशाली देव म्हणजे झ्यूस. त्याने कुणाकुणाला शिक्षा दिल्याच्या कथा आहेत. त्यात टॅंटलस नावाचा एक माणूस होता. याची कथा वेगवेगळ्या प्रकारे सांगितली गेली आहे. टॅंटलस याने आपल्याला देवांसारखे सुख भोगायला मिळावे अशी इच्छा व्यक्त केली. त्याची इच्छा झ्यूसला नाईलाजाने मान्य करावी लागली. टॅंटलसने देवांसाठी मेजवानी आयोजित केली. त्यात त्याने आपल्या मुलाचा बळी देऊन त्याचे मांस जेवायला वाढले. हे लक्षात आल्यावर या कृत्याने देव संतापले. झ्यूसने टॅंटलसला चिरंजीव राहण्याची शिक्षा केली. त्याला एका फळझाडाखाली छातीभर पाण्यात जखडून राहण्याची शिक्षा केली. तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी टॅंटलस खाली वाकला की पाण्याची पातळी खाली जाईल. त्याने फळ खाण्यासाठी मान उंचावली तर फळझाडाची फांदी वर जाईल. अशी ती शिक्षा होती. ह्या शिक्षेबाबत वाचल्यावर मला एका हिंदी चित्रपटातील संवाद आठवला, 'हम तुम्हे लिक्विड ऑक्सिजन
में डुबोयेंगे| लिक्विड तुम्हें जीने नहीं देगा और ऑक्सिजन तुम्हें मरने नहीं देगी|" ( यातील शास्त्रीय तत्त्वांचा फार विचार करायचा नाही हे बऱ्याच अन्य चित्रपटांप्रमाणे यालाही लागू पडते.)
     सार्वकालिक आदर्श राज्यकर्ते असणाऱ्या छ. शिवाजी महाराजांनी स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या रांझे गावची पाटीलकी करणाऱ्या बाबाजी भिकाजी गुजर याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून त्याचा चौरंग केला होता. स्त्री सन्मानाचा आग्रह धरणारी ही शिक्षा शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ठोठावली होती‌. हे समजल्यावर तर शिवरायांच्याबद्दलचा आदरभाव अधिकच वाढतो. शिक्षेचे अजून एक उदाहरण अफझलखान स्वारीच्या नंतरचे आहे. या स्वारीच्या वेळी फितुरी करणाऱ्या खंडोजी खोपडे याला जीवनदान द्यावे ही वडीलधाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याशी एकनिष्ठ असणाऱ्या कान्होजी जेधे यांची विनंती शिवरायांना डावलता आली नाही. पण 'अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे' ह्या तत्त्वाने शिवरायांनी खंडोजीचा डावा पाय आणि उजवा हात तोडण्याची शिक्षा केली. ज्या पायाने अफझलखानाकडे खंडोजी चालत गेला तो एक पाय तोडला आणि ज्या हाताने तलवार चालवली तो हात तोडला‌. कठोर न्यायाचा आदर्श शिवरायांनी घालून दिला.
         १९८० च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांनी दहशतवादी कारवाया केल्या. या कारवायांमध्ये अनेकजण बळी पडले. दहशतवादाचा बीमोड करणे आवश्यक होते. दहशतवादी लपून बसले आहेत म्हणून अमृतसरमधील पवित्र अशा सुवर्ण मंदिरात सैन्य पाठवावे लागले. 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' असे नाव या कारवाईला देण्यात आले. या कारवाईच्या काळात बुटासिंग हे देशाचे गृहमंत्री होते. त्यांनी या कारवाईचे समर्थन केले. याबाबतीत शीखांच्या अकाल तख्त या सर्वोच्च धर्मपीठाने त्यांना 'तनखैय्या' म्हणजे धार्मिक गुन्हेगार ठरवले. त्यांना मंदिरात येणाऱ्या भाविकांचे जोडे साफ करण्याची शिक्षा केली. हे योग्य की अयोग्य यावर त्याहीवेळी चर्चा झाली. पण बुटासिंग यांनी या शिक्षेचा स्वीकार केला होता.
            आजही काही समाजांत जातपंचायत कमी अधिक प्रमाणात कार्यरत आहेत. या पंचायतीत वेगवेगळ्या प्रकरणांची दखल घेऊन शिक्षा दिल्या जातात. त्यातील एक शिक्षा एक रुपया दंडाची असते. ही रक्कम आता फारच कमी मूल्याची असली तर समाजात झालेली अवहेलना संबंधित व्यक्तीला मानहानीकारक असते. मा. सर्वोच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी एका प्रख्यात वकिलाला एक रुपया दंडाची शिक्षा केली होती. त्यातही हे तत्त्वच आहे.
           आपल्या लष्करी दलात उच्च पदावर काम केलेल्या ले.जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या भेटीचा योग दहा वर्षापूर्वी मला आला होता. शेकटकर यांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात दहशतवादावर नियंत्रण आणण्याची प्रभावी कामगिरी बजावलेली आहे. आमच्या भेटीच्या वेळी शेकटकर यांनी सांगितलेले एक वाक्य मला पक्के लक्षात आहे‌.  कायदा आणि सुव्यवस्थेसाठी हे वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. ते म्हणाले होते, "शिक्षेचा कठोरपणा नव्हे तर प्रत्येक अपराधाला शिक्षा होणारच ही खात्री अपराध नियंत्रणात ठेवू शकते."

सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

गुजरात सहल

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी