सकारात्मक पुढाकारात सहभाग

         कोणतीही यंत्रणा राबवत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणी उत्पन्न होत असतात. त्यामुळे यंत्रणेचा अपेक्षित परिणाम होत नाही. आपल्या समाजात तर समस्या आणि त्यांची सोडवणूक यामध्ये खूप वैविध्य आहे. तसेच विशाल लोकसंख्येमुळे यंत्रणेची उपयुक्तता कमी भासत असते.  साधारणपणे समस्यांची जंत्री सर्वांनाच माहिती असते. पण या समस्या सोडवण्यासाठी पुढाकाराची आवश्यकता आहे. आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी ,सरकार आणि नागरिक असे तीन घटक आहेत. लोकप्रतिनिधी त्यांच्या कल्पनेनुसार आणि बऱ्याचवेळा लोकांच्या इच्छेनुसार समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकप्रतिनिधी यंत्रणेचा वापर करून या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत राहतात. वेगवेगळ्या समस्यांसाठी काही वेळा तज्ज्ञ मार्गदर्शक यांचीदेखील मदत घेतली जाते. बहुतेक वेळा असे मार्गदर्शक साधारणपणे काही विशिष्ट समस्येपुरता विचार करणारे असतात असे लक्षात येते.

(प्रतिनिधी ओळखपत्र, हे पुढच्या उपयोगासाठी परत घेण्यात आले.)

         समस्यांच्या सोडवणुकीसाठी एकत्रितपणे विचार करणे अतिशय आवश्यक आहे. कारण समाजामधील विविध गटांचे हितसंबंध वेगवेगळे असतात. काही बाबतीत वेगवेगळ्या गटांचे हितसंबंध एकमेकांच्या विरोधातदेखील असू शकतात. या पार्श्वभूमीवर समस्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेणाऱ्या एका कार्यक्रमात दिनांक ३० मे २०२६ या दिवशी सहभागी होता आले याचा मला वेगळ्या प्रकारचा आनंद झाला.

        पॉलिसी ॲडव्होकसी रिसर्च सेंटर (पार्क) ही संस्था गेले काही वर्षे एकत्रितपणे वेगवेगळ्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेते आहे. समाजसेवी उद्देशातून या संस्थेची स्थापना झाली आहे. या संस्थेमध्ये उच्चशिक्षित तरुण वर्ग कार्यरत आहे. पार्क, दे आसरा, पीपीसीआर आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 'पुणे विकास मंथन' य नावाच्या दिवसभराच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी उद्योग, पायाभूत सुविधा, पर्यावरण,शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, अर्थ अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत व्यक्ती तसेच संस्थांचे प्रतिनिधी यांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. प्रत्यक्ष कार्यशाळेत वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळपास १०० पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये पार्क संस्थेचा परिचय करून देण्यात आला.  तर्कशुद्ध पद्धतीने महाराष्ट्राच्या विविध समस्या सोडवण्याची उपाययोजना कशी करण्यात येत आहे याची माहिती त्यात देण्यात आली. या सत्रामध्ये झालेल्या प्रास्ताविकात सांगण्यात आलेली माहिती अतिशय लक्ष वेधून घेणारी होती. ती माहिती अशी की गेल्या दोन अडीच वर्षांमध्ये राज्यस्तरावर तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा विविध विभागीय स्तरावर मंथन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळे ठिकाणी झालेल्या कार्यशाळांमध्ये बाराशेपेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच या कार्यशाळांमध्ये लोकप्रतिनिधी सरकारी अधिकारी हेदेखील उपस्थित होते. या विविध कार्यशाळांमध्ये जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त सूचना एकत्रित करण्यात आल्या. या सूचनांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले. एखाद्या विषयाच्या धोरणात मोठा बदल सुचवणाऱ्या सूचना, धोरण योग्य आहे परंतु काही हस्तक्षेप आवश्यक आहे अशा सूचना आणि धोरण योग्य असून अंमलबजावणी करताना दुरुस्ती आवश्यक आहे अशा प्रकारच्या सूचना या तीन गटात वर्गीकरण करण्यात आले. सूचनांचे वर्गीकरण करून त्याबाबत आवश्यक तो पाठपुरावा वेगवेगळ्या स्तरावर करण्यात आला. जवळपास अडीच हजार सूचनांचा विचार कोणत्या ना कोणत्या प्रकारे अमलात आणण्यात आला. ही आकडेवारी अतिशय प्रभावी आहे . या पुढाकाराची कार्यक्षमता याकडेवारीतून दिसून येते. या सत्रात पुण्याच्या महापौर मा. मंजुषा नागपूरे उपस्थित होत्या. त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने कसा विचार चालू आहे, या मंथन कार्यक्रमातून काय मिळावे याबाबत अपेक्षा व्यक्त केली.

       सुरुवातीचे सत्र संपल्यानंतर वेगवेगळे गटांमध्ये आलेल्या व्यक्तींनी दोन सत्रांमध्ये आपापल्या विषयाशी संबंधित चर्चा केली. मी शिक्षण विषयीच्या गटात सहभागी झालो. या गटात महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ काम करत असलेले अनेक सदस्य उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या वतीने चालू असलेल्या शाळांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. महानगरपालिकेच्या वतीने सध्या मराठी, इंग्रजी, उर्दू आणि कन्नड अशा वेगवेगळ्या माध्यमाच्या पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक अशा मिळून एकूण ३२० शाळा सुरू आहेत. त्यातील पंधरा शाळा दोन वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत.  या शाळांसाठी उपलब्ध निधी, त्याचा खर्च, शाळांची स्थिती यांची माहिती देण्यात आली. उपस्थित सदस्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या. शाळांमधील सुविधांचा तसेच शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी या सूचना करण्यात आल्या. सर्व सूचनांमागे त्या त्या व्यक्तिच्या अनुभवाचा आधार होता. सर्व चर्चा अतिशय सकारात्मक झाली.

        अशाच प्रकारची चर्चा अन्य गटांमध्येदेखील झाली. शेवटच्या सत्रात वेगवेगळ्या गटांमध्ये झालेल्या चर्चेचा आणि सूचनांचा गोषवारा त्या त्या गटाच्या प्रतिनिधीने सांगितला. यामुळे अन्य गटांमध्ये काय चर्चा झाली याची माहिती सर्वांना मिळाली. 

      यानंतर थोडा वेळ मुक्त चर्चा झाली. त्यामध्ये अजून काही सूचना आल्या. या चर्चेदरम्यान पीपीसीआरचे प्रमुख प्रसिद्ध उद्योगपती श्री. सुधीर मेहता यांनी 'जोपर्यंत शहराची स्वच्छता आपण चांगली राखत नाही तोपर्यंत प्रगतीला मर्यादा राहतील' असा मुद्दा काहीशा उद्वेगाने मांडला.

        या सत्रात मा. महापौर यांच्यासह महानगरपालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम हेदेखील उपस्थित होते. दोघांनीही प्रतिनिधींच्या सूचना लक्षपूर्वक ऐकल्या. आयुक्तांनी आपल्या बोलण्यात पायभूत सुविधा वाढवण्याच्या उपायांची माहिती दिली. तसेच गरज आणि सद्यस्थिती यात किती तफावत आहे याची काही आकडेवारी दिली. आयुक्त आणि महापौर दोघांनीही आलेल्या सूचना उपयुक्त आहेत असे मत व्यक्त केले. या मंथन चर्चासत्राचा पाठपुरावा आगामी काळात करणार असल्याचे दोघांनीही सांगितले.

        या दिवसभराच्या चर्चासत्रात सकारात्मक इच्छा आणि उर्जा याचा अनुभव आला. वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ, मान्यवर व्यक्तिंच्या भेटी झाल्या काही नवीन ओळखी झाल्या. माझ्यासाठी हा उत्साह वाढवणारा अनुभव होता.

सुधीर गाडे, पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


Comments

  1. पार्क संस्थेने घेतलेले इनिशिएटिव्ह म्हणजेच पुढाकार फारच चांगला आहे याची खरंच गरज आहे आणि शिक्षण क्षेत्रात तर नक्कीच गरज आहे तुम्ही केलेली मांडणी ही फार छान आहे नक्कीच याचा उपयोग होईल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

गुजरात सहल

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी