प्रवासात भेटलेले माणिककाका

                      " सर, हे डॉ. माणिक शेडगे." साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शशिकांत शिंदे म्हणाले. शिंदे सरांनी नुकतीच आमच्या महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून पीएचडी पूर्ण केली आहे. सदरा पायजमा घातलेल्या व्यक्तिला मी नमस्कार केला. शिंदे सरांच्या पुढच्या वाक्याने उत्सुकता अधिक वाढली. शिंदेसर पुढे म्हणाले, "माणिककाका सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील पारधी समाजातील लोकांसाठी लोकसेवा परिवार नावाची सेवाभावी संस्था चालवतात."  काही दिवसांपूर्वी सातारा पुणे प्रवासातील हा प्रसंग. ही ओळख झाल्यावर पुढे जवळपास दीडदोन तास आमचा संवाद सुरू होता.

    (डावीकडून डॉ शशिकांत शिंदे, डॉ माणिक शेडगे)

                     या संवादात मिळालेली माहिती भारावून टाकणारी होती. थक्क करून सोडणारी होती. साताऱ्यापासून जवळच असलेले अंगापूर हे माणिककाकांचे गाव. बारावीनंतर १९९० मध्ये त्यांनी सातारच्या आर्यांग्ल आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. गाव जवळच असल्याने शिक्षणासाठी एसटीने येजा करत असत. या प्रवासात अनेकवेळा एसटीत पारधी समाजातील स्त्री पुरुष असत. या समाजातील लोकांचे वागणे बोलणे, बाकिच्या लोकांचे वागणे बोलणे यामध्ये असलेला फरक , पारधी समाजाच्या माणसांना मिळणारी तुच्छतेची वागणूक या गोष्टी ते प्रवासात बघत होते. हा समाज असा का , यांना अशी वागणूक का मिळते यासारख्या प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केले. 

       याच प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधासाठी माणिककाका गावाबाहेर असलेल्या पारधी समाजाच्या वस्तीवर जाऊन धडकले. तिथे असलेल्या भीषण परिस्थितीने त्यांच्या काळजात कालवाकालव झाली. कच्ची घरं, क्वचित कुठे साडी अथवा धोतराच्या आडोशाने मांडलेला संसार, मुलाबाळांची वारेमाप संख्या, अस्वच्छता, दुर्गंधी, दारुच्या नशेत झिंगलेला पुरुष वर्ग, मोठ्या मोठ्या आवाजात चाललेले संवाद, भांडणं अशा परिस्थितीचे दर्शन माणिककाकांना झाले. कुठेतरी अस्वस्थतेने मनात घर केले होते. ही परिस्थिती बदलता येईल का? या प्रश्नाचं नकारार्थी उत्तर मान्य करायला तारुण्याची उर्मी तयार नव्हती. मग सुरू झाली उत्तर शोधण्याची धडपड.

      उत्तराच्या या धडपडीत माणिककाकांच्या लक्षात आले की हा समाज राजस्थानमधून स्थलांतरित झालेला लढाऊ भटकंती करणारा समाज आहे. इंग्रजांची राजवट भारतात स्थिर झाली तरीही या समाजातील लोक इंग्रजांविरुद्ध लढतच होते. यावर इंग्रजांनी शोधून काढलेला उपाय म्हणजे १८७१ चा गुन्हेगारी जमातीचा कायदा.‌ या कायद्यानुसार अन्य अनेक जातींप्रमाणेच पारधी समाजाचा समावेश गुन्हेगारी जातीत समावेश केला. याचा अर्थ या समाजातील नवजात बालकापासून ते जराजर्जर माणसापर्यंत सर्व लोक इंग्रजांनी गुन्हेगार ठरवले. या समाजाची स्थिर वस्ती नसल्यामुळे त्यांना उपजीविकेचे निश्चित साधन नव्हते. इंग्रजांच्या धोरणामुळे तर गुन्हेगारीचा शिक्का जन्मतः बसला. हा निघायला १९५० उजाडावे लागले. पण पिढ्यानपिढ्या चालत आलेली परिस्थिती फार बदलली नाही.

          माणिककांच्या परिस्थिती बदलण्याची प्रयत्नांची सुरुवात झाली शिकवण्याच्या प्रयत्नातून. विद्यार्थी दशेत असलेले माणिककाका शनिवार ,रविवारी पारधी समाजाच्या वस्तीवर जायचे. मुलांना शाळेत पाठवा, मी अभ्यास घेतो असं सांगायचे. दुर्लक्ष, अपमान, शिव्याशाप यांच्या भडिमारातही माणिकाकांची चिकाटी शाबूत राहिली. हळूहळू माणसांच्या विशेषतः पारधी समाजातील मातांच्या मनात त्यांच्या प्रयत्नांबद्दल भरवसा निर्माण झाला. त्यांची साथ मिळत गेली. त्यातून आठवडी शाळेची संकल्पना पुढे आली. कोणी भल्या, बऱ्या परिस्थितीतल्या माणसाने आपलं पत्र्याचं घर या कामासाठी देऊ केलं. ही कामाची सुरुवात होती.

          माणिककाकांचं चिकाटीने चाललेलं काम हे हळूहळू वाढत गेलं. समाजाचं काहीतरी भलं व्हाव असं वाटणारी समानशील माणसं त्यांच्या या प्रयत्नांमध्ये जोडली गेली. श्रम, सहभाग, निधी अशी वेगवेगळ्या प्रकारची मदत वाढू लागली. यातून आठवडी शाळांची संख्या वाढत गेली. 

        यानंतर माणिककाकांच्या लक्षात आलं तो स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न. समाजरुढीमुळे लहान वयातच होणारी लग्नं आणि शरीरसंबंध यातून मुली अल्पवयीन असतानाच गरोदर राहत. कुटुंबनियोजनाची काहीही माहिती नसल्याने एकामागून एक बाळंतपणाला मुलींना सामोरं जावं लागत. अतिदारिद्रयामुळे नवजात बालकांची पुरेशी काळजी घेणं शक्य होत नव्हतं. यावरही उपाययोजना सुरू केली. गरोदर मुलीची काळजी घेणं, कुटुंबनियोजनाचा प्रसार करणं, बाळंतपणानंतर काळजी घेणं यासाठी माणसं उभी राहिली.

         आजपर्यंत तीन दशकांपेक्षा अधिक काळ माणिककाका पारधी समाजाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, कौशल्य विकास या वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात ते कार्य करत आहेत. त्यांचं कार्य आज जवळपास २००० माणसांच्या आयुष्याला स्पर्श करत आहेत. कुटुंबनियोजन करुन परतणाऱ्या पारधी महिलेची माहिती न घेता 'तिनं अजून एक मूल जन्माला घातलं' असा कुत्सित शेरा मारणारी शिक्षिका तर पारधी समाजातील गुणवंत मुलाला आपल्या घरात ठेवून घेऊन त्याला क्रीडा क्षेत्रात संधी मिळवून देणारा शिक्षक अशी समाजाची दोन्ही रुपं माणिककाकांनी अनुभवली आहेत. वैयक्तिक दात्यांबरोबरच कंपन्यांच्या सीएसआरमधून त्यांच्या संस्थेला मिळतो आहे. बाळंतपणाच्या दिवशी जवळपास १० किमी चालत जाऊन बाळंत होणारी महिला, गावानं राहायला जागा दिली म्हणजे स्मशानाला नाही असं सांगितलं म्हणून उकरुन काढावा लागलेला मृतदेह,  सौर उर्जेवर घरं उजळवण्याचा प्रकल्प, स्थिर वस्ती नसल्यामुळे आधार कार्ड सारखं महत्वाचं ओळखपत्र मिळवण्याची धडपड, बहिणीकडं पाहुणा म्हणून आलेल्या भावावर वेळीच शस्त्रक्रिया करून त्याचा वाचवलेला जीव, कल्याणकारी सरकारी यंत्रणेचा भाग असलेल्या प्रांत अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या आवारातच दिवस काढणारे पारधी कुटुंब, मतदानाच्या दिवशी राजकीय कार्यकर्त्यांच्या पैसे वाटपाच्या लगबगीच्या दिवशी पारधी समाजातील माणसांनी केलेल्या कष्टाचे हक्काचे पैसे मिळवण्याची धडपड, त्यासाठी ऐकावा लागलेला कुत्सित शेरा असे अनेक अनुभव माणिककाकांच्या 'पारधी माय' या पुस्तकात वाचायला मिळतात. ते विचार करायला भाग पाडतात. पत्नी सौ.शुभांगी यांचादेखील या कामातील वाटा पुस्तकात मांडला गेला आहे.

         अनेकांचे आयुष्य बदलणारे माणिककाका मृदुभाषी, जमीनीवर पाय घट्ट रोवलेले आणि मिळणाऱ्या मदतीबद्दल कृतज्ञ असलेले निगर्वी व्यक्तिमत्वाचे असे आहेत. 'परिस्थिती बदलण्याचं काम सगळ्यांच्या सहकार्याने शक्य झालं आणि होतं आहे' असं ते वारंवार सांगत होते. योगायोगाने माझा अकरावी बारावीचा वसतिगृहातील मित्र त्यांचा वैद्यकीय अभ्यासक्रमाचा मित्र निघाला. तोही धागा गप्पांमध्ये उलगडला गेला. प्रवासात भेटलेले माणिककाका आणि त्यांच्यासोबतच्या गप्पा सदैव स्मरणात राहतील.

( माणिककाकांच्या प्रकल्पाचे नाव 'आस' असे समर्पक आहे. लोकसेवा परिवाराचा संपर्क क्रमांक 7020593089 )

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


Comments

Popular posts from this blog

यात्रा काशी प्रयागराज अयोध्येची

गुजरात सहल

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी