डोक्यावरील केस आणि पण(प्रतिज्ञा)

       डोक्यावरील केस ही माणसाची ओळख. विविध प्रकारची केशभूषा ही तर हजारो वर्षांपासून माणूस करत आला आहे. या केसांशी संबंधित काही पण(प्रतिज्ञा) या लेखात वाचायला मिळतील.

        भारताच्या इतिहासातील सर्वात जुना उल्लेख आढळतो आर्य चाणक्य यांचा. मगधाचे शक्तिशाली साम्राज्य नंद घराण्याचे होते. सामर्थ्यबरोबर अहंकारही वाढीला लागला. या अहंकारातूनच राजा धनानंद याने आर्य चाणक्य यांचा अपमान केला. अतिशय बुद्धिमान आणि निस्पृह चाणक्यांना हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी भर दरबारात पण उच्चारला की, "जोपर्यंत उन्मत्त धनानंदाला सिंहासनावरुन खाली खेचत नाही तोपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही." या पणाची पूर्तता झाली ती चंद्रगुप्त मौर्य हा पराक्रमी योद्धा राजसिंहासनावर आरुढ झाल्यावर. या मौर्य घराण्याने प्राचीन इतिहासात भारताच्या सर्वाधिक मोठ्या भूभागावर जवळपास दोन शतक सत्ता गाजवली.
        राजकारणातील हा पण आध्यात्मिक क्षेत्रातही पहायला मिळतो. भारतातील एक अतिशय प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे तिरुपती येथील श्री बालाजी हे होय. कोट्यावधी हिंदुंचे श्रद्धास्थान आहे. तिथे नतमस्तक होणारे भाविक आपल्या डोक्यावरील केसांचा त्याग करतात. संसाराच्या ऐहिक सुखात स्वतःला अंतर्मुख करणारा आध्यात्मिक वाटचालीवरचा हा जणू एक टप्पा. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक हा टप्पा गाठतात. हाही एक 'पण' आहे. काहीजण नवसपूर्तीसाठीदेखील हे करतात.
     असाच एक पण काही लोक नोव्हेंबर महिन्यात करतात. 'नो शेव्ह नोव्हेंबर' असे याला म्हटले जाते. महिनाभर दाढी करायची नाही. त्यातून काही बचत होते ती गरजू लोकांना मदत म्हणून द्यायची असा हा 'पण' आहे. अर्थात दाढीची निगा राखायला जास्त खर्च होतो. परंतु सामाजिक बांधिलकी जपणारा हा 'पण' आहे असे म्हणता येईल.

   (डॉ भरत बलवल्ली यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
       
      मध्यंतरी डॉ.भरत बलवल्ली या प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकांची मुलाखत ऐकली. त्यांना लहानपणापासूनच संगीताची जाण आहे. योगाने त्यांचा नुकत्याच निधन पावलेल्या ज्येष्ठ गायिका कै.आशा भोसले यांचा सहवास अगदी बालपणापासून लाभला. शास्त्रीय संगीताची साधना सुरु झाली. त्यात प्रगती होत गेली. आशाताईंच्या सहवासातून मास्टर दीनानाथ यांच्या गायकीचे धडे मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे मास्टर दीनानाथ आणि मंगेशकर कुटुंबियांचेही दैवत. त्याचीही दीक्षा बलवल्ली यांना मिळाली. त्यातून त्यांनी सावरकर यांच्या गीतांचा संग्रह आपल्या चालींमध्ये प्रसिद्ध करायचा ठरवला. पण त्यात अडथळे येत गेले. बलवल्ली यांच्या म्हणण्यानुसार काही अडथळे महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारकडूनही आणले गेले. हा प्रकल्प लांबत गेला. परंतु एका टप्प्यावर बलवल्ली यांनी 'पण' केला की की जोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत डोक्यावरील केस काढणार नाही. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्यांचे केस मानेपर्यंत वाढले‌. दाढीदेखील वाढली. २०१३-१४ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला. त्यानंतर त्यांच्या एका परिचिताने त्यांना सुचवले की मानेपर्यंत रुळणारे केस आणि दाढी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक वैशिष्ट्य बनले आहे. त्यांची नीट निगा राखली तर ते चांगलं दिसेल. ते बलवल्ली यांना पटलं आणि त्यांनी केस तसेच ठेवले. परंतु प्रकल्प पूर्ण होईपर्यंत केस न कापण्याचा त्यांचा 'पण' होता हे तर आहेच.

            
            (डॉ. शरद खरे यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)

       अजून एक उदाहरण माझ्या परिचयातील आहे. डॉ. शरद वासुदेव खरे हे राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक. सध्या त्यांचे वय ८१ वर्षे आहे. त्यांचे गुरू प्रा.ना.र.इनामदार यांच्या सांगण्यावरून वैकुंठलाल मेहता इन्स्टिट्यूटमधील केंद्र सरकारची नोकरी सोडून त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. यामुळे मोठे आर्थिक नुकसान त्यांना सोसावे लागले. पण त्याबद्दल शरदरावांची कोणतीही तक्रार नाही. शरदराव संघाचे स्वयंसेवक. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै.प्रा. श्रीपती शास्त्री यांचा निकटचा सहवास शरदरावांना लाभला. मूळचे कर्नाटकातील असणारे श्रीपती शास्त्री हे तेव्हाच्या पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आणि नंतर विभागप्रमुख होते. त्यांचे २०१० मध्ये निधन झाले. शास्त्रीजींच्या स्मरणार्थ डॉ. श्रीपती शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस हीदेखील शरदरावांनी सुरू केली आहे. शास्त्रीजींच्या जीवनावर स्मृतिग्रंथ काढण्याची कल्पना होती. पण ती बरेच वर्षे रेंगाळत पडली. ती कल्पना प्रकल्प म्हणून शरदराव खरे यांनी हाती घेतली. त्यासाठी भरपूर परिश्रम घेतले.' हा ग्रंथ प्रकाशित होत नाही तोपर्यंत 'दाढी' करणार नाही असा 'पण' शरदरावांनी केला. अखंड परिश्रम करून हा ग्रंथ  'संघयात्री' या नावाने ४ जुलै २०२१ यादिवशी प्रकाशित झाला. नंतरच शरदरावांनी वाढवलेली दाढी काढून टाकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या वाटचालीवर आधारित एक ग्रंथ शरदरावांनी २०२५ मध्ये संपादित करून प्रकाशित केला आहे.
        माणसे कोणतातरी 'पण' करतात. त्यासाठी प्रयत्न करतात. काहीजण तर आपले सर्वस्व पणाला लावतात. अशा काही गोष्टी लक्षात राहतात. निश्चयाचे बळ दाखवून देतात.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. प्रतिज्ञा आणि त्याचा प्रतीक म्हणून दाढी वाढवणे केस वाढवणे.... असे करून बहुदा मनाचे मनोबल वाढत असेल... आणि घेतलेली प्रतिज्ञा पूर्णत्वास जात असेल... छान लेख🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न