पुरणपोळीचे जेवण
(कथा)
"अगं, ऐकलंस का?" कमलाकरपंतांनी हाक मारली. "काय हो?" लक्ष्मीबाई उत्तरल्या.
"अगं, उद्या रात्री पुरणपोळीचा स्वयंपाक कर. आपल्याकडे पाच सहाजण जेवायला येणार आहेत." "करते. पण कोण आहेत मंडळी?"
"आपलीच माणसं! विश्वनाथदादा, उमाबाई, आपल्या दोघांकडचे वकील आणि स्वतः न्यायाधीशसाहेब येणार आहेत."
(कल्पनाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)
कमलाकरपंतांचं हे बोलणे ऐकले आणि लक्ष्मीबाई एकदम गंभीर झाल्या. शांतच राहिल्या. कारणही तसेच होते.
तसं म्हटलं तर कमलाकरपंत तालुक्याच्या या गावी परकेच होते. नशीब काढायचं म्हणून आपलं छोटं गाव सोडून बाहेर पडले. एकदोन ठिकाणी काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. त्यातूनच विश्वनाथदादा यांच्याशी ओळख झाली आणि या गावात आले. त्यालाही आता जवळपास १५ वर्षे होत आली होती. इथं आले तेव्हाच कमलाकरपंतांनी आपला व्यवसाय छोट्या प्रमाणात सुरू केला होता. मेहनती स्वभाव, वेळ सांभाळण्याची कसोशी, लोकांशी मृदू बोलणं, संबंध वाढवणं यातून हा व्यवसाय हळूहळू वाढू लागला होता. विश्वनाथदादा आणि उमाबाई यांच्याशीही अगदी घरोब्याचे संबंध निर्माण झाले होते. एकमेकांकडे येणंजाणं, सणवार, रीतीरिवाज या सगळ्या गोष्टीत दोन्ही घरं समरसून सहभागी होत होती. रक्ताचं नसलं अगदी जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं.
जिव्हाळ्याच्या या नात्यातूनच एक कल्पना पुढे आली. दोनही कुटुंबं एकमेकांच्या इतक्या जवळ आलीत तर घरंही जवळच असावी. कल्पना अगदी पसंत पडावी अशीच होती. नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं. योगायोगाने एक मोठा प्लॉटही मिळाला. खरेदी बांधकाम असे पुढचे बेत सुरु झाले. पण इथंच एक अडचण उभी राहिली.
अडचण म्हटली तर तशी व्यावहारिक होती. विश्वनाथदादाचं घराणं हे एक अतिशय सुखवस्तू घराणं होतं. पैशाला कशाची कमतरता नव्हती. पण कमलाकरपंतांचा जम व्यवसायात बसत होता पण पैसे मात्र पाहिजे तेवढे नव्हते. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्लॉट आणि घराच्या बांधकामाएवढे पैसे सध्या कमलाकरपंतांकडे नव्हते. आता काय करायचं? "तुला आता जमतात तेवढे दे. उरलेले मी घालतो. तू नंतर होईल तसे दे." विश्वनाथदादांचा हा प्रस्ताव काहीसा नाखुशीनंच कमलाकरपंतांनी मान्य केला आणि प्लॉट खरेदी , बांधकाम असं एक एक सुरु होत गेलं. एक मुख्य दरवाजा आणि दोन्हीकडं सारख्या खोल्या, सोयी असं घराचं बांधकाम सुरू झालं.
हळूहळू घर एकाएका विटेनं वर येऊ लागलं. गावातही याबद्दल लोक एकमेकाला सांगू लागले. कुठं आणि कशी माशी शिंकली हे सांगता आलं नाही पण हळूहळू विश्वनाथदादांच्या मनात संशयानं घर केलं. आज आपण पैसे घातले, प्लॉटही दोघांच्या नावे घेतला पण उद्या न जाणो कमालकरपंतानी अजून काही केलं तर काय करायचं? जमिनीवरच्या घराच्या वाढत्या बांधकामाबरोबरच मनातील संशयाचं घरंही वाढत गेलं.
विश्वनाथदादांनी अजून दोघाचौघांशी कानगोष्टी केल्या आणि एकेदिवशी कमलाकरपंतांना सांगितलं की ,"या घरावर तुझा काहीही हक्क नाही." कमलाकरपंतांना हा मोठाच धक्का होता. अगदी सैरभर होऊन गेले.
मग यथावकाश न्यायालयात खटला दाखल झाला. दोन्हीकडचे वकील हिरीरीने आपले साक्षीपुरावे मांडत होते. कमलाकरपंतांची बाजू तशी वरचढ होती कारण प्लॉटवर संयुक्त मालकी दाखवलेली होती. जेवढे पैसे त्यांनी विश्वनाथदादांना आजवर दिले होते त्याची नोंद होती. त्यामुळे निकाल काय लागणार हे दोन्ही बाजूंना कळून चुकले होते. याच खटल्याचा निकाल आता दोनचार दिवसांवर आला होता. याचवेळी कमलाकरपंतांनी पुरणपोळीच्या जेवणाचा घाट घातला होता. हे सगळं लक्ष्मीबाईंच्या मनात अगदी थोड्या वेळात येऊन गेले.
कमलाकरपंत बोलू लागले," लक्ष्मी, आपली बाजू वरचढ आहे हे विश्वनाथदादाच्या वकिलांनी बोलून दाखवल्याचे मला समजलं आहे. त्यामुळे निकाल आपल्या बाजूनेच लागेल. पण ज्याचा आपल्यावर विश्वास नाही त्याचा शेजार कशाला आणि त्याच्याशी संबंध तरी कशाला? मी त्या जागेवरचा हक्क सोडून देणार आहे. मला पैसेही नको आणि ती माणसंही नको. माझा आता धंद्यात चांगला जम बसला आहे. पैसाही पुष्कळ मिळतोय. आपण कशाला यांच्यात गुंतून पडायचं?" यावर लक्ष्मीबाईंनी हो अशी मान डोलावली. "संबंध संपवायचे असं मी ठरवलं आहे. तर ते गोडाच्या जेवण करून संपवू असं मनात आलं. म्हणून उद्याचं हे जेवण."
ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी जेवण पार पडलं. मंडळींनी ओढूनताणून हसू आणत प्रसंग निभावला. कमलाकरपंतांनी बोलल्याप्रमाणे आपला हक्कही सोडून दिला. पुढचे अनेक दिवस, अनेक महिने गावात एकच चर्चा होती ती म्हणजे 'पुरणपोळीचं जेवण'.
सुधीर गाडे पुणे
( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्य
कता नाही.)

Comments
Post a Comment