बालपणाचा एक तुकडा

             मोठं झाल्यावर माणसाचं सगळ्यात जास्त काय नुकसान होतं तर ते म्हणजे बालपण संपतं. काहीही केलं तरी ते परत येत नाही. माझ्या दृष्टीने बालपणीचा सुखाचा काळ म्हणजे खेळ, मौजमजा, अभ्यास, संघाची शाखा, सणवार, घरातील वेगवेगळी कार्यं, शाळा , अभ्यास आणि माझ्याबाबतीत महत्त्वाचं म्हणजे वाचन! आमची आई ती.गं.भा.नंदा हिच्याकडून वाचनाची आवड अनुवांशिकतेने माझ्यात उतरली आहे. 

(छायाचित्रात आई श्रीमती नंदा गाडे, श्री वसंत भगत गुरुजी आणि मी)

      यात वाचनाच्या बाबतीत महत्त्वाची गोष्ट म्हणजे साखरवाडीच्या रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी आमच्या कै. ती.बापुंच्या दुकानासमोरचं 'भगत गुरुजींचं पुस्तक आणि फोटो विक्रीचं दुकान'. रविवारी सकाळी १० च्या सुमारास सायकलवर उंचपुरे, गोरे, पांढरा सदरा धोतर आणि गांधीटोपी घातलेले, कपाळावर बुक्का लावलेले 'वसंत भगत गुरुजी' सायकलवरुन येत असत. सायकलवर दोन्हीकडे मोठ्या पिशव्या, मागे कॅरियरवर गठ्ठा असं घेऊन आलेल्या गुरुजींचं दुकान थाटलं जाण्याची मी वाटच पाहत असे. कधी एकदा त्यांचं दुकान मांडलं जातंय असं मला होत असे. त्यांचं दुकान मांडून झालं की तिथंच शेजारी पायरीवर बसून मी तासनतास पुस्तके वाचत असे. प्रामुख्याने आध्यात्मिक, पौराणिक पुस्तके असत. गुरुजींनीही मला त्याबद्दल कधी हटकलं नाही. प्रोत्साहनच दिलं.

      पुणे जिल्हा आणि सातारा जिल्हा यांच्या हद्दीवरुन नीरा नदी वाहते. नीरा नदीच्या उत्तरेला पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका आहे. तर नीरा नदीच्या दक्षिणेला सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आहे. बारामती तालुक्यातील निरा नदीच्या काठावर असलेल्या मुरुम गावचे भगत घराणे पिढ्यानपिढ्यांचे वारकरी.भगत कुटुंबियांचे घर नीरा नदीच्या काठावर शेवटी उताराला. त्यामुळे नळाचे पाणी उशीरापर्यंत येत राही. ते भरायला गावकरी येत राहत. घराच्या आवारात तोंडल्याचे वेल. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे गावकरी हक्काने तोंडली मागायला येत. वारकरी संप्रदायाचे संस्कार असल्याने गरजेला मदत करणे हीच घराची रीत.

 आदरणीय वसंत भगत गुरुजींनीही गळ्यात माळ घराच्या परंपरेनुसार घातली. नित्यपाठ ,पारायण सुरु केले. धडपड करत त्यावेळची ११ वी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तीन वेगवेगळ्या विषयात पदवी मिळवली. खटपट करून त्यांच्याच गावात प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून १९६१ मध्ये नोकरी मिळवली. सुरुवातीला चौथी, सहावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या भगत गुरुजींकडे इयत्ता सहावी सातवीचे वर्ग सोपविण्यात आले. तसं पाहिलं तर अचानक आलेली ही मोठी जबाबदारी म्हणजे आपली क्षमता दाखवण्यासाठी मिळालेली संधी आहे असं भगत गुरुजींनी मानलं. पद्धतशीर प्रयत्न सुरु केले. त्या वर्गांच्या निकालाची टक्केवारी गुरुजींनी वाढवली. पुढे १००% निकालाची वहिवाट सुरू केली. शिक्षकाला आनंद आणि समाधान देणारी अशीच ही कामगिरी आहे. अर्थात याची दखलही घेतली गेली.

           धडपडणाऱ्या भगत गुरुजींनी शिकवण्याबरोबरच सुट्टीच्या दिवशी पुस्तकविक्री आणि फोटो फ्रेमविक्रीचा व्यवसाय सुरू केला. साखरवाडी आणि सोमेश्वरनगर अशा दोन ठिकाणी हा व्यवसाय त्यांनी जवळपास पाच दशके केला.

            भगत गुरुजींचे गाव पुणे जिल्ह्यातील असले तर भौगोलिकदृष्ट्या साखरवाडीजवळ आहे. जेमतेम ५-७ किमीचे अंतर. त्यांचा आणि आमच्या घराचा संबंध तीन पिढ्यांचा. आमचे आजोबा कै. कृष्णाजी पांडुरंग गाडे यांच्यापासूनचा हा स्नेहसंबंध. गुरुजी वारकरी तर आमचे कै. बापू वारकरी संप्रदायाबाबत विशेष श्रद्धा असलेले. अखंड हरिनाम सप्ताह, पारायण, कीर्तन यानिमित्ताने परस्परांशी संबंध अधिक दृढ झाला. कै. बापूंची त्यांना सदैव मदत करण्याची वृत्ती हादेखील त्यातील एक धागा. एकमेकांच्या सुखदुःखाची वास्तपुस्त करणे. त्यात सहभागी होणे हे तर ओघाने आलेच. एकमेकांच्या अडीअडचणीदेखील परस्परांना मोकळेपणाने सांगितल्या जात. स्नेहाचे बंध अशाच देवाणघेवाणीतून दृढ होत गेले.

            आता ९१ वर्षांच्या असलेल्या भगत गुरुजींना त्यांचे नातू श्री ज्ञानेश्वर भगत यांच्या पुण्याजवळील शेवाळेवाडी येथील घरी भेटण्याचा नुकताच योग आला. गुरुजींचे स्मरण अजूनही चांगले आहे. मनमोकळ्या गप्पा झाल्या. सुखदुःखाची उजळणी झाली. गुरुजींच्या सूनबाई, नातू, नातसून, पणती यांची भेट झाली. भगत कुटुंबियांचे अगत्य अनुभवले. गुरुजींची भेटीमुळे मला बालपणाचा एक तुकडा पुन्हा स्मरता आला. खूप आनंद झाला!

सुधीर गाडे , पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. बालपणाच्या पायघड्यांवरती आयुष्याचा प्रवास सुखद होतो... सुंदर लेख🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी