मामाच्या गावची सुट्टी

      'झुक झुक अगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी,                 पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया'           हे बालगीत गेली अनेक दशके मराठी माणसाच्या कानात रुंजी घालत आहे. पण मला मात्र मामाच्या गावाला जाताना झुक झुक अगीनगाडी गाडी नाही याचाच अनुभव आहे. आमचे गाव सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यातील साखरवाडी तर मामाचे गाव पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील पणदरे या गावाजवळ असणारी मानाजीवाडी(मानाप्पावस्ती). हे गाव त्यावेळी जेमतेम शंभर दीडशे घरांचं होतं. शाळेत शिकत असताना साधारणपणे माझ्या इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीच्या (१९८३-१९८८) सुट्टीपर्यंत आम्हा तीन भावंडांची रवानगी दरवर्षी मामाच्या गावी असायची. साखरवाडीवरुन थेट एसटी नसल्याने गाडी १-२ ठिकाणी बदलबदलत शेवटी मामाच्या गावी पोचायचो. जवळपास अर्धा दिवस त्यात जायचा. पण एकदा की मानाजीवाडीला पोचलो की धमाल असायची.


           (छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने)

          धमाल असण्याचे पहिलं कारण म्हणजे आम्ही तीन सख्खे भाऊ, तीन मावसभाऊ, तिथेच असणारी सात मामेभावंडं आणि एक मावसभाऊ, तिघं चुलत भाऊ आणि पुण्यावरून येणारे दोघे मामेभाऊ असा मोठा गोतावळा तिथं जमायचा. यात भर पडायची आजोळच्या घराशेजारी असणाऱ्या मुलांची. अशी सगळी मिळून १५-२० जण आम्ही एकत्र धमाल करायचो.
         आताची धमाल आणि त्यावेळची धमाल यात खूपच फरक आहे. पहिलं कारण म्हणजे पाण्याचा असलेला तुटवडा! त्याकाळी साखरवाडीत नळाचे पाणी होते पण
मामाच्या घरी नळाने पाणी आलेलं नव्हतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर सगळ्यांनी मिळून आपल्याला जमेल ती कळशी, हंडा, बादली,‌कावड असं घेऊन एक दीड किलोमीटरवरुन चार पाच खेपा करून घरातील पाण्याचा हौद, बॅरल अशा गोष्टी पाण्याने भरून टाकायच्या आणि मग पुढे दिवसाला सुरुवात. कोण किती पाणी आणतंय याची चढाओढ असे.
      जवळच धरणाचा फाटा(कालवा) आहे‌. त्याला पाणी असले की कपडे घेऊन आमचं सगळं लटांबर चालत फाट्यावर आंघोळीसाठी पोचायचं. मनसोक्त आंघोळ करून, कपडे तिथंच धुवून मग सगळी जत्रा परत माघारी. तोपर्यंत आमच्या शारदामामी आणि आजीनं नाष्ट्याला काहीतरी केलेलं असायचं.  नाष्टा झाला की घरासमोरच्या थोड्या मोकळ्या जागेत क्रिकेट सुरू व्हायचं. क्रिकटचं बॅट आणि बॉल हे एवढंच साहित्य असायचं. बाकीचं कोणतंही साहित्य नसायचं. मग अगदी स्टंपदेखील जवळपासच्या छोट्या काठ्यांचे व्हायचे. पण क्रिकेटचा सामना मात्र इरेसरीनं(इर्षेने) व्हायचा. आरडाओरडा, रडारड, भांडाभांडी असे सगळे प्रकार व्हायचे. त्यावेळी आयुष्यातला तो सर्वात मोठा प्रसंग असं वाटायचं.
       दुपारचं जेवण झालं की ऊन उतरेपर्यंत घरातच पत्ते, भेंड्या, चल्लस (पाटावर मागच्या बाजूला घरं आखून चिंचोके फासे म्हणून वापरायचं. जेवढं दान पडेल तेवढी घरं सोंगटी पुढे हलवायची. सगळ्यात आधी ज्याच्या सोंगट्या पटाच्या मध्यभागी पोचेल तो विजयी) असे वेगवेगळे बैठे खेळ खेळायचे. ऊन उतरलं की क्रिकेट किंवा गोट्या, विटीदांडू अशाप्रकारचे मैदानी खेळ. कधीतरी दूरवर फिरायला जाणे. अंधार झाला की परत माघारी घरी.
      रात्रीचं जेवण झालं की बाहेर चांदण्यात गप्पा टप्पा, पत्ते अशा गोष्टी चालायच्या. कधीतरी आजुबाजुच्या वाड्यात कोणीतरी भाड्याने व्हीसीआर आणला असेल तर तिथं पैसे देऊन रात्री सिनेमा बघायला जाणे. रात्री बाहेर अंगणात झोपणे. अंगणात झोपलं की आभाळभर पसरलेलं चांदणं दिसत असे. झोपही छान लागे. सकाळी दिवस उजाडला की पुन्हा तोच क्रम. असं जवळपास महिनाभर चालायचं.
        या सुट्टीच्या दिवसांत अजून एक अनुभव अधेमधे यायचा. आमच्या मामाच्या घरासमोरच महालक्ष्मीचं छोटंसं मंदिर आहे. तेव्हा ते पत्र्याचं होतं. गेल्या काही वर्षांपूर्वी ते चांगलं बांधलं गेलं आहे. या देवीला गावचे लोक काही ना काही कारणाने नवस करत असत. तो नवस फेडण्यासाठी किंवा परंपरा म्हणून कधीतरी मंदिरात सगळ्यांना प्रसादाचे जेवण असे. अशा प्रसादाच्या दिवशी घरातून ताट,वाटी, पेला घेऊन मंदिरात जेवायला जायचे. तिथे पडेल ते काम करायचं. जेवण झाल्यावर आपलं ताट, वाटी, पेला घेऊन परत यायचं. या प्रकारामुळे कचरा होत नसे. विशेषत: प्लास्टिक तर त्या काळात नव्हतेच. ज्याचा प्रसाद असेल त्यालाही फक्त स्वयंपाकाचीच भांडी आणावी लागत असे.
        याच सुट्ट्यांच्या काळात आमचा एक मामेभाऊ, एक मावसबहीण यांची लग्नं वेगवेगळ्या वर्षी झाल्याचं आठवतं. या लग्नाच्या काळात तर ८-१५ दिवस घरात माणसांची गर्दीच गर्दी. काम, धाम, गप्पा टप्पा अशी नुसती धांदल उडालेली होती. 
       त्या काळात विजेचं प्रमाण कमी होते. पिवळे बल्ब असायचे. क्वचित एखादी ट्यूबलाईट होती. धाकट्या मामांचे किराणा मालाचे छोटं दुकान होतं. तिथं थोडीफार मदत करायची. घरात एक गाय होती. तिला क्वचित चारा घालायचा. घरापुढचं अंगण चार सहा दिवसांनी शेणानं सारवायला मदत करायची. या सगळ्यात महिना निघून जायचा आणि मग आम्ही परत साखरवाडीला परत यायचो.
       या सुट्टीचा एक स्वाभाविक परिणाम माझ्या शरीरावर होत असे. महिनाभर उन्हातान्हात हिंडणं, फिरण़, खेळणं व्हायचं. त्यामुळे त्वचेचा रंग अगदी गडद व्हायचा. मग कुणीतरी गमतीने म्हणे की, "सुट्टीत रंग अगदी पक्का झालाय."
     
या सुट्टीच्या दिवसात कष्टही खूप असायचे पण सर्वांनी मिळून काम करायचे असल्यामुळे ते फार अवघड वाटत नसत. कष्ट असले तरीही हे आनंदाचे दिवस होते. त्यामुळे मला हे पक्कं समजलं की "आनंद हा आरामाच्या साधनांत नाही तर आपल्या माणसांच्या सोबतीत आहे."

सुधीर गाडे पुणे 
( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न