व्यावसायिक आयुष्यात समाधान मिळवण्याचे दोन मार्ग
प्रत्येक माणसाच्या काही अंगभूत क्षमता असतात. माणसाची स्वतःची आवड हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. या दोन्हीवर आधारित संधी मिळणे हा एक भाग आहे. व्यावसायिक आयुष्यात जर क्षमता आणि आवड या दोन्हींशी मेळ घालणारी संधी मिळाली तर ते व्यावसायिक आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
व्यावसायिक आयुष्यात समाधान मिळवण्यासाठी दोन मार्ग आहेत असे वाटते. एक म्हणजे जे आवडते ते करणे किंवा जे करतोय ते आवडून घेणे. ह्यापैकी कोणताही एक मार्ग निवडला तरच समाधान मिळते. अन्यथा असमाधान राहते. माणूस कुढत बसतो. याबाबतील दोन उदाहरणे पुढे लिहिली आहेत. दोनही उदाहरणे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीशी(म.ए.सो.शी) संबंधित आहेत.
(डॉ श्रीराम लागू यांची छायाचित्रे इंटरनेटवरून साभार)
मध्यंतरी दिवंगत अभिनेते डॉ.श्रीराम लागू यांचे आकाशवाणीवर व्यक्त केलेले मनोगत ऐकायला मिळाले. डॉ लागू हे म.ए.सो.च्या भावे हायस्कूलचे माजी विद्यार्थी होते. पुढे पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ते नाट्य क्षेत्राकडे ओढले गेले. शिक्षण सुरू असताना पुणे ड्रॅमॅटिक असोसिएशन या हौशी संस्थेची त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्थापना केली. त्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळी नाटके रंगभूमीवर सादर केली. पुढे बी.जे.मधील वैद्यकीय शिक्षण संपले. त्यानंतर पुढील शिक्षण घेऊन त्यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. तो करत करत नाटकात कामे करणे सुरुच होते. पण या सगळ्यात खूपच धावपळ होत असे. पण आपला ओढा नाटकाकडेच आहे हे त्यांना चांगलेच लक्षात आले. मग दक्षिण आफ्रिकेत तीन वर्षे राहून पैसे मिळवायचे आणि परत आल्यावर नाट्यक्षेत्रातच काम करायचे असे त्यांनी ठरवले. दक्षिण आफ्रिकेत गेल्यावर ते नाटकांपासून दूर फेकले गेले आणि आपल्या आवडीची त्यांना अधिकच तीव्रतेने जाणीव झाली. योगायोगाने तिथे इंग्लंडहून आलेल्या शिक्षकांच्या गटासोबत नाटक करण्याची संधी त्यांना मिळाली. आता निश्चय पक्का झाला. ते परत भारतात आले आणि नाट्यक्षेत्रात काम करण्यासाठी धडपड करु लागले. पण लगेच संधी काही मिळेना. त्यांच्या जवळच्या माणसांनी त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याची खटपट केली. पण वयाच्या चाळीशीत असलेले लागू आपल्या निर्णयावर ठाम होते. काही महिन्यांनी योगायोगाने त्यांना एक संधी मिळाली. अजून काही भूमिका मिळाल्या. सुरुवातीची त्यांची काही नाटके कोसळली. पण हळूहळू त्यांच्या वास्तववादी अभिनय शैलीला दाद मिळू लागली. ते यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेते झाले. चित्रपटांमध्येदेखील संधी मिळाली. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यांनी स्वत:वर बंधन घालून घेतले. तुलनेने चित्रपटात जास्त पैसे मिळत त्यामुळे ते काम चालू राहिले. पण रंगभूमीवर काम करण्याची आवड जोपासण्यासाठी लागू यांनी शनिवार रविवार चित्रपटाच्या चित्रीकरणातून मोकळीक मिळवली. आवडीचे क्षेत्र व्यावसायिक आयुष्यासाठी निवडले की समाधान मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ.श्रीराम लागू होय.
(म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
दुसरे उदाहरण सौ. उज्ज्वला गायकवाड यांचे आहे. त्यांनी दीर्घकाळ म.ए.सो.भावे प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम केले. काही वर्षांपूर्वी त्या निवृत्त झाल्या. त्यांचे वडील हे शिक्षक होते. त्यांच्या आग्रहामुळे गायकवाडबाईंना शिक्षक व्हावे लागले. शिक्षिका होण्याची विशेष आवड त्यांना नव्हती. शिक्षिकाच व्हायचे असे वडिलांनी सांगितल्यावर मला रडू कोसळले असे त्यांनी निवृत्तीच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात सांगितले. पण या क्षेत्रात आल्यावर त्यांनी हे काम आवडून घेतले. शाळेमध्ये वेगवेगळे कल्पक उपक्रम घेतले. प्राथमिक शाळेमध्ये तयार केलेली प्रयोगशाळा हा त्यामधील एक विशेष उपक्रम. आवडीने काम करत राहिल्यामुळे त्यांचे कार्य वाढत गेले. याचाच परिणाम म्हणून त्यांना 'राष्ट्रपती पारितोषिक' देऊन गौरविण्यात आले. स्वीकारलेले व्यावसायिक काम आवडून घेतले आणि तळमळीने प्रयत्न केले की त्याची दखल घेतली जाते याचे हे एक आदर्श उदाहरणच.
(पॉल गोगॅं यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
आवडते ते करणे किंवा जे करतोय ते आवडून घेणे यात समाधान नक्की मिळते. पण लौकिक अर्थाने यश मिळतेच असे नाही. पॉल गोगॅं (१८४८-१९०३)हे १९ व्या शतकातील एक महत्त्वाचे फ्रेंच चित्रकार होते. सुखी, समृद्ध बालपण अनुभवल्यानंतर तसे सुरळीत आणि सुखात चाललेले आयुष्य त्यांनी चित्रकलेसाठी सोडून दिले. घरादारापासून दूर गेले. चित्रकलेची स्वतःची एक वेगळी शैली विकसित केली. ते हयात असताना त्यांना पैसा अथवा प्रसिद्धी फारशी मिळाली नाही. पण त्यांना आपण करतोय त्यात समाधान होते. त्यापायी सोसावे लागणाऱ्या हाल अपेष्टांचे त्यांना फारसे काही वाटले नाही. समाधान घेऊन ते विपन्नावस्थेतच मरण पावले. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची शैलीला प्रसिद्धी मिळाली. असे हे एक करुण उदाहरण.
समाधान, यश, सुख यापैकी कशाला प्राधान्य द्यायचे आणि त्याची किती किंमत मोजायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. पण आवडीशी व्यावसायिक आयुष्य जोडले की समाधान मिळते हे निश्चित.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता
नाही.)



आवडीच्या क्षेत्रात काम करायला संधी मिळाली तर नक्कीच समाधान आणि आनंदाची प्राप्ती होते... तिथे पैसा प्रतिष्ठा या गोष्टीत दुय्यम स्थानी जातात.. नेहमीप्रमाणे सुंदर लेखन झाले सर
ReplyDeleteसर आभारी आहे.
Deleteश्री नचिकेत फडके यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteयोग्य आहे. एकतर आवडतय ते करा किंवा जे करताय त्यात आवड निर्माण करा. पालकांचा career निवडीमधला सहभाग फार मोलाचा असतो, खास करून 5वी ते 8वी या काळात पालकांनी पाल्याशी सतत संवाद केला पाहिजे. हे केल्यास बरेच प्रश्न कमी होतील.