कर्माचं ओझं

                                        (कथा)

     दारातून बाहेर पडलेल्या नर्सला बायजाबाईंनी उत्सुकतेने विचारलं, "पोरगा की पोरगी?" "पोरगा!" नर्सनं उत्तर दिलं.बायजाबाईंचा चेहरा एकदम उतरला. "मावशी, अहो पोरासाठी लोकं काय काय करत्यात! आनि सुनंला पोरगा झाला तर तुम्ही का तोंड पाडताय?" नर्सनं विचारलं. "जाऊ दे पोरी." एवढंच म्हणून बायजाबाई शांत बसल्या. जरा वेळ वाट बघून बक्षीसी मिळण्याची आशा सोडून नर्सही पुढच्या कामाला लागली.


                 (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)

      बसल्या बसल्या बायजाबाईला गेल्या वर्षीच्या वारीतला प्रसंग आठवू लागला. बायजाबाईंचं माहेर आणि सासर दोन्ही माळकरी. वारीची परंपरा पिढ्यानपिढ्या दोन्हीकडं चालत आलेली होती. घरात हरिपाठ रोज होत असे. गावातल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायणाच्या सोहळ्यात त्यांचं घर असायचं म्हणजे असायचंच. महिन्याची एकादशी कधी चुकली नाही. घरात माळकरी मंडळींची येजा सारखी असायची. पंढरीची वारी म्हणजे तर आनंदाची पर्वणीच. बायजाबाईंची वारीदेखील अनेकदा झालेली होती. 

        गेल्या वर्षीच्या वारीत एका मुक्कामावर अशीच लोकांची गर्दी जमली होती. काहीतरी वेगळं चाललेलं दिसत होतं. मागची माणसं टाचा वर करून करून पाहत होती. कान देऊन ऐकत होती. हे सगळं बघून उत्सुकतेनं बायजाबाईदेखील थांबल्या. कॉलेजात शिकणारी १०-१२ पोरंपोरी काहीतरी करून दाखवत होती. त्यांनी गोल धरला होता. एकसारखे कपडे घातले होते. मोठ्या आवाजात नाटक चालू होते. त्याला पथनाट्य म्हणतात हे बायजाबाईंना थोड्या वेळात ध्यानात आलं. या पथनाट्य्याच्या शेवटच्या प्रसंगात एका मुलीनं टाहो फोडला, "नको गं आई, मला नको मारू! मला जग बघायचंय! मला जग बघायचंय!" त्या मुलीचा तो टाहो पाहून बायजाबाईंना सुनेची आठवण झाली. सुमन निवृत्तीची बायको. सुमनला दोन वेळा दिवस गेले होते. काय होईल पोरगा की पोरगी याचा घोर बायजाबाईंच्या जिवाला लागला होता. पण कुठूनतरी पोटात पोरगा आहे का पोरगी हे अचूक सांगणाऱ्या डॉक्टरचा पत्ता बायजाबाईला मिळाला होता. "पोर पदरात घेऊन घराचं नाव फुडं कसं चालायचं? पोरीचा जल्म कडेला न्यायचा म्हंजी काय खायाचं काम हाय का?तिच्या लग्नाला किती हुंडा द्यावा लागंल?" या आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर बायजाबाईकडं नव्हतं. शेवटी डॉक्टरकडं जाऊन खात्री केली. पोरगीच होती. "मग काय? पाडून टाका." बायजाबाईनं वेळ न घालवता सांगितलं होतं. एकदा सोडून दोनदा हाच प्रकार घडला होता. 

         आता पथनाट्य बघताना सुमनच्या पोटातून पाडलेल्या याच दोन पोरी आपल्याला हाका मारताहेत असंच बायजाबाईच्या मनानं घेतलं. त्या कॉलेजच्या पोरांकडं गेल्या,"पोराहो तुम्ही माझं डोळं उघाडलं. म्या लय वंगाळ काम केलं. आता पुन्यांदा नाय असं करनार." बायजाबाईंनी वचन दिलं. पथनाट्य करणाऱ्या मुलांची अलाबला घेऊन डोळे पुसत पुसत बायजाबाई गर्दीबरोबर पुढ चालू लागल्या.

         वारी संपली. बायजाबाई घरी माघारी आल्या. घडला प्रसंग निवृत्ती आणि सुमनला सांगितला. पुढं सुमनला दिवस गेले. तेव्हापासून बायजाबाईंना सारखं वाटायचं, " पोरगीच व्हावी. म्हंजी जरा उरावरचा भार उतरल्यासारखा व्हईल." हेच वाक्य त्या मनाशी परत परत घोकायच्या. सुमनची सगळी काळजी घ्यायच्या. औषधपाणी वेळेवर होईल असं बघायच्या. पांडुरंगाचं नाव तर सारखं घेत राहायच्या. एवढं सगळं करुन पण आता पोरगाच झाला होता म्हणून बायजाबाईंचा चेहरा उतरला होता.

    ‌‌ या पोराचं नाव ध्रुव ठेवलं. बघता बघता ध्रुव मोठा होऊ लागला. सुमनला पुन्हा एकदा दिवस गेले. "आतातरी पोरगी व्हावी. म्हंजी पांडुरंगानं माफ केलं असं व्हईल." बायजाबाईंच्या राहून राहून मनात येई. एकादशीबरोबरच अजून उपासतापास त्या करु लागल्या. या उपासातापासाला यावेळी तरी हवं तेच फळ मिळावं असं त्यांच्या मनात फिरुन फिरुन येई.

        पोटात दुखू लागल्यावर सुमनला दवाखान्यात घेऊन गेल्या. सोबत बायजाबाई होत्याच. सुमन बाळंत झाली. पण पुन्हा एकदा पोरगाच झाला होता. बायजाबाईंच्या काळजावर आघात झाला. " हाय रं माझ्या कर्मा! पांडुरंगानं माफी काय दिली न्हाई. माफी काय दिली न्हाई." त्या पुटपुटत राहिल्या. आता हे ओझं उरावर घेऊनच त्यांना राहिलेला जन्म काढायचा होता.

सुधीर गाडे पुणे 

( कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता 

नाही.)

Comments

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी