ओढवलेली वेळ

                         (कथा)

       ललिताबाई डोक्याला हात लावून बसल्या होत्या. काय करावे काहीच सुचत नव्हते. वेळच तशी ओढवली होती. समोर भुजंगरावांचा अचेतन देह पडला होता. त्याचे अंत्यसंस्कार करायला आता कोण मदत करील या प्रश्नाचे उत्तर काही ललिताबाईंना मिळत नव्हते.

              (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)

   ललिताबाई आणि भुजंगराव यांचा संसार तब्बल चाळीस वर्षांचा. एका तालुक्याच्या गावात खाऊनपिऊन सुखी असलेला दोघांचा संसार. इतरांच्या मानाने तसा सुखवस्तूच. मुलगा दिनेश अगदी लहानपणापासून हुशार. शाळा महाविद्यालयात अगदी पहिल्या दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा. स्वाभाविकच या छोट्या गावात त्याला पाहिजे तसं शिक्षण नव्हतं. म्हणून शाळा संपली की पुढच्या शिक्षणासाठी तो जो पुण्याला गेला तो गावापासून लांबच राहत गेला. आधी पदवी मग अमेरिकेत पदवीनंतरचे शिक्षण मग यथावकाश अमेरिकेत नोकरी आणि अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले.
        ललिताबाई आणि भुजंगरावांना आपल्या मुलाच्या म्हणजे दिनेशच्या प्रगतीचे कोण कौतुक. आल्या गेल्या माणसासोबत बोलायला एकच विषय "आमच्या दिनेशचं असं झालं. दिनेशनं तसं केलं." समोरचा माणूसही तेवढ्यापुरतं, " हो का!छान!" असं म्हणायचा आणि काढता पाय घ्यायचा.
           नवरा,बायको आणि मुलगा यापलिकडे जणू या कुटुंबाचं आयुष्यच नव्हत. तसं घरंही भरलेलं होतं त्यामुळे पैशाची अडचण कधी भासली नव्हती. कुणाशी काही फार संबंधही नव्हते. अगदी जेवढ्यास तेवढे बोलणं, येणंजाणं तर अगदी क्वचितच.
         यांचं असं वागणं. त्याला लोकांचाही तसाच प्रतिसाद. "आपल्याला काही कुणाची गरज नाही. कुणाचं कधी उसनं घेतलं नाही आणि कधी कुणाला दिलं नाही." हे भुजंगरावांचं नेहमीचं पालुपद. योगायोगाने ललिताबाईंचा स्वभावही अगदी भुजंगरावांशी मिळताजुळता. त्यांनाही कधी कोणाकडे जाणं नको असायचं की बोलायचं म्हणजे जिवावर यायचं. आईवडीलांची ही वृत्ती आपसूकच मुलगा दिनेशमध्येही उतरली होती. म्हणतात ना 'खाण तशी माती.' दिनेशही आपण भला आणि आपला अभ्यास, नोकरी एवढं बरं.
             दिनेशनं अमेरिकन नागरिकत्व घ्यायचा विषय जेव्हा आईवडिलांकडे काढला तेव्हा जरा तणावाचा प्रसंग आला होता. पण "ठेललंय काय इथं. त्याच्यासारख्या बुद्धिमान मुलाला अमेरिकेतच खरा वाव आहे. त्याची प्रगती तिथंच होईल." असा विचार नवराबायकोंनी केला आणि दिनेश अमेरिकन झाला. आधी तसा दर वर्षी तो यायचा. महिनाभर राहायचा. हवं नको बघायचा. ललिताबाई आणि भुजंगरावदेखील दोन तीन वेळा अमेरिकेला जाऊन आले. तिथली समृद्धी, प्रगती , झगमगाट याचा अनुभव घेऊन परत आले. आल्यावर मग काय चारपाच महिने हाच विषय. 'अमेरिकेत असं . अमिरिकेत तसं.' ऐकणारा अगदी कंटाळून जायचा. पण यांचं कौतुक काही संपायचं नाही.
           पुढे दिनेशही मोठ्या कंपनीत नोकरीला लागला आणि नोकरीतल्या जबाबदाऱ्या एक एक वाढत गेल्या. यथावकाश लग्न झालं. सुनेच्या बाळंतपणाच्या वेळी पुन्हा एकदा ललिताबाई आणि भुजंगरावांना अमेरिकेची वारी घडली. गोंडस नातीचं तोंड बघून तिचं कोडकौतुक करून मंडळी माघारी आली. दिनेश आता नोकरी आणि संसारात इतका गुरफटला की दरवर्षी एक महिना येणं जमायचं नाही. मग वर्षाचं येण दीड वर्षावर, दोन वर्षांवर गेलं. दिनेश शेवटचं येऊन गेला त्याला आता जवळपास तीन वर्षे होत आली होती. आता फक्त व्हिडिओ कॉलवरच भेट आणि बोलणं.
          वयोमानाने ललिताबाई आणि भुजंगरावही कत गेले. एवढा लांबचा प्रवास झेपेना आणि अमेरिकेत खूप दिवस राहवेनाही. मग दोघांनी ठरवलं की दिनेशची आशा सोडून द्यायची. शरीराची दुखणी वाढत चालली. 'आता जायची वेळ येत चालली. पण वेळ काय सांगून येते का?' हाच विचार दोघांच्या मनात सारखा येत राही. अशा वेळी माणूसबळ लागतंच. पण ते आणायचं कोठून. कधी कुणाला जीव लावला नाही की कुणाला जवळ घेतलं नाही. प्रश्न बिकट होता खरा.
        पण त्यावरही उपाय निघाला. गावात दोन पाच वर्षांपासून सरकारी वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं होतं. तिथल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मृतदेह हवे असतात. देहदानाचा फॉर्म भरून दिला की वेळेला त्यांची माणसं येतात आणि मृतदेह घेऊन जातात. हे समजल्यावर ललिताबाई आणि भुजंगराव दोघांनीही ताबडतोब देहदानाचे फॉर्म भरून दिले. व्यवस्था झाली होती. वेळ आली की दिनेशही जमेल तसे येऊन जाणार होता.
        आज सकाळपर्यंत भुजंगरावांचं नेहमीसारखं चाललं होतं पण नाष्टा केला आणि ते जे जागेवर कोसळले ते उठलेच नाहीत. ललिताबाईंनी नेहमीच्या डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरही येऊन गेले. पण सगळं संपलं होतं. डॉक्टरांनी मृत्यू दाखला लिहून दिला. ललिताबाईंनी धीर एकवटला आणि वैद्यकीय महाविद्यालयात फोन केला. पण.....
          पण कालच तालुक्यातील एका गावात विषबाधेचा प्रकार मोठ्या प्रमाणावर घडला होता. ८-१० जण तर रात्रीतच गेले होते आणि महाविद्यालयाशी संबंधित रुग्णालयात एकदम शंभरदीडशे जणांवर उपचार चालू होते. सगळे डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय, मावशा याच गडबडीत होते. "अजून दोन चार दिवस तरी काही सांगता येणार नाही." ललिताबाईंनी हे वाक्य ऐकून फोन ठेवला आणि त्या डोक्याला हात लावून बसल्या होत्या.

सुधीर गाडे पुणे 

(कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न

खाद्यपदार्थांच्या काही आठवणी