आता तशी वेळ येणार नाही!
(कथा)
(ओढवलेली वेळ या कथेचा पुढचा भाग)
ललिताबाई जवळपास अर्धा तास तशाच अवस्थेत बसून राहिल्या. नंतर हळूहळू विचारशक्ती काम करू लागली. त्यांना लक्षात आले की अजून दिनेशला फोन केला नाही. मग त्यांनी लगेच दिनेशला फोन लावला. अमेरिकेत अर्धी रात्र झाली होती. "काय गं आई?" झोपाळलेल्या स्वरात दिनेशने विचारले. ललिताबाई," बाबा....!" एवढाच शब्द उच्चारू शकल्या आणि स्फुंदून स्फुंदून रडू लागल्या. दिनेश झोपेतून खडबडून जागा झाला. "आई..... आई......" असं म्हणत राहिला दोन पाच मिनिटांनी ललिताबाईंचे रडू जरा ओसरले आणि परिस्थितीचा खुलासा दिनेशला झाला. तोही हतबुद्ध झाला. हजारो किलोमीटरवरून अशा वेळी तो काय करू शकणार होता? तोही गप्प बसला. पण काही वेळाने त्याने विचारले, "आई, तो कोविडच्या काळात आपल्या गल्लीत तुम्हाला मदत करणारा कोण गं?" "संतोष!" ललिताबाई म्हणाल्या. "त्याला सांगून बघ. काहीतरी करेल तो." या दिनेशच्या बोलण्यावर "बघते." असं ललिताबाई म्हणाल्या आणि त्यांनी फोन ठेवला.
क्षणार्धात त्यांच्या डोळ्यासमोर कोविडचा तो कालखंड तरळून गेला. घराबाहेर पडता येत नव्हते पण बाहेरून किराणामाल, भाजीपाला, औषधे या गोष्टी तर आणाव्या लागतच होत्या. ललिताबाई आणि भुजंगराव दोघे घाबरूनच घरात बसले होते. काय होणार ? कसं होणार हे सुचत नव्हतं? एकदोन दिवसांनी दरवाजावर टकटक झाली आणि भुजंगरावांनी दरवाजा उघडला. "काका, मी संतोष. आपल्या गल्लीतल्या गणपती मंडळाचा अध्यक्ष! आम्ही सर्व कार्यकर्ते घरोघर जाऊन काय मदत हवी आहे हे विचारतोय. तुम्ही सांगा तुम्हाला कसली मदत हवीय?" या संवादानंतर भुजंगराव आणि ललिताबाईंना गल्लीतल्या मंडळाने लागेल ती सर्व मदत केली. कोविडचा तो काळ पुन्हा एकदा ललिताबाईंच्या डोळ्यांपुढून सरकून गेला. त्यांनी भुजंगरावांचा फोन घेतला आणि त्यावरून संतोषला फोन केला. "आलोच काकी." संतोष म्हणाला आणि दहा मिनिटांतच तो अजून एक दोघांना बरोबर घेऊन ललिताबाईंच्या घरी पोचला.
सगळी परिस्थिती बघून संतोषने सर्व सूत्रे हातात घेतली. ललिताबाईंच्या फोनवरून संतोष दिनेशशी बोलला. कुणाकुणाला निरोप द्यायचा, अंत्यसंस्कार किती वाजता करायचे?, काय काय तयारी कशी करायची? अशा सगळ्या गोष्टी त्याने आपल्यासोबतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत सगळ्या गोष्टी नीट पार पाडल्या.
अंत्यसंस्कार तर पार पडले. दिनेशला जमेल तसं तो येणार होता. पुढे दिवसकार्य यांचे विधी यातदेखील संतोषने लक्ष घालून सर्व गोष्टी नीटपणे पार पडतील असं पाहिलं. प्रसंगी स्वतः पुढे होऊन अगदी स्वतःच्या खिशातून खर्च केला. दिनेशही अगदी दोन चार दिवसांसाठी म्हणून येऊन गेला.
सर्व दिवसकार्य संपलं. आता ललिताबाई घरात एकट्याच उरल्या. त्या या सगळ्या दिवसातली संतोष आणि इतर मंडळींची धावपळ जवळून बघत होत्या. त्यांना एक गोष्ट निश्चितपणे जाणवली की ते सगळेजण अगदी आपल्या घरातील प्रसंग असावा असे वागत होते. कुठंही परकेपणाचा भाव नव्हता. जणूकाही आपलीच माणसं आपल्यातल्या प्रसंगाला सामोरी जाताहेत आणि गोष्टी पार पाडताहेत हेच जाणवत होतं. आयुष्याच्या या अनुभवानं या वयात ललिताबाई धडा शिकल्या होत्या. 'पैशानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो.'
या पंधरा दिवसातील संतोष आणि मंडळाच्या बाकिच्या कार्यकर्त्यांचं येणजाणं पुढंही चालू राहिलं. ललिताबाईंनी आपणहून मंडळाच्या कामाची माहिती घेतली. दररोजची आरती, चतुर्थीची विशेष पूजा, गणेशोत्सव आणि त्याच्या निमित्ताने होणारे वेगवेगळ्या स्पर्धा आणि कार्यक्रम, गणेशजन्माच्या वेळचा याग, वर्षातून एकदा होणारं रक्तदान, जूनमध्ये शाळा सुरू होताना केली जाणारी गरजू विद्यार्थ्यांना मदत असं आणि बरंचकाही. त्यांना जाणवले की पैशांची अपेक्षा न करता काम करणारी ही मंडळी आहेत.
मग एकेदिवशी संतोष घरी आला असताना त्यांनी त्याला सांगितले, "संतोष अरे दर आठवड्याला तुम्ही पुढचे कार्यक्रम ठरवायला भेटता ना? मग इथून पुढे ते आमच्या घरीच भेटायचं. हे घर तुमचं आहे असंच समजा." "हो काकी." संतोष म्हणाला. आता दर आठवड्याला ही मंडळी ललिताबाईंच्या घरी जमू लागली. ललिताबाईदेखील आवर्जून स्वयंपाकाच्या मावशींना सांगून त्यांच्यासाठी काहीबाही खायला करून द्यायच्या. हळूहळू आठवड्याचा तो वार कधी येतो याची वाट ललिताबाई पाहू लागल्या. मग हळूहळू संतोष आणि मंडळी अधल्यामधल्या वारी येऊन जाऊ लागली. काय हवंय याची चौकशी करू लागली. पुढे पुढे तर रोजच कुणी ना कुणी घरी येऊन जाई.
असेच दोनचार महिने गेले. अचानक ललिताबाईंच्या मनात विचार आला. 'आता जास्तच थकल्यासारखं वाटू लागलंय. आपणही जाणार एक दिवस. मग पुढे. हे गेले तेव्हा किती अवघड परिस्थिती झाली होती.'क्षणार्धातच त्यांच्या मनात विचार आला , 'आता तशी वेळ येणार नाही.' आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं.
सुधीर गाडे पुणे
(कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

डॉ केतकी मोडक यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteअशा प्रकारच्या काम करणाऱ्या संस्थांची खरेच गरज आहे.
श्री राजेन्द्र जोशी यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteअजूनही समाजात माणूसकी आहे . आपण आपल्याकडून माणुसकी दाखवायला हवी .
श्री प्रकाश क्षीरसागर यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteअनेक शहरांमध्ये, आणि खेड्यात ही अशी जेष्ठ नागरिक राहतात, त्यांच्या या स्थितीत खूप च असे प्रसंग येतात, एका यथार्थ वास्तववादी शब्द चित्रण केले आहे,ही समस्या गंभीर रूप धारण करु शकते.
श्री अरूण सोनावणे यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteखूप छान कथा, खरी किंवा काल्पनिक असो.
मी स्वतः हे केले आहे. म्हणजे यातील काही भाग माझ्या अनुभवाची सत्य कथा आहे.