सर्वांगाने उत्तम 'संगीत आनंदमठ' नाटक
महायोगी श्री अरविंद यांनी 'वंदे मातरम्' ला भारत देशाचा महामंत्र म्हटले आहे. या महामंत्राने अनेक क्रांतिकारकांना फासावर जाण्याची प्रेरणा दिली तर अनेकांना देशासाठीच जगण्याची शिकवण दिली या गीताचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्थान अढळ आहे. हे गीत ज्यांना स्फुरले त्यांचा उल्लेख अरविंद यांनी ऋषी बंकिमचंद्र चटोपाध्याय असा केला आहे. ज्यांना ऋचांचे दर्शन झाले त्यांना ऋषी म्हटले गेले. याच ऋचांनी तयार झाले ते जगातील सर्वात जुने वाड्:मय. ते म्हणजे 'वेद'! ऋषी बंकिमचंद्र यांना असेच 'वंदे मातरम्' गीताचे दर्शन झाले. एका क्षणी भावना उचंबळून आल्या आणि या गीताचा जन्म झाला त्याचा दिनांक सांगितला जातो तो सात नोव्हेंबर १८७५ कार्तिक शुद्ध दशमी.
७ नोव्हेंबर १८७५ या दिवशी हे गीत जन्माला आले. ते प्रसिद्ध झाले ते नंतर १८८१-८२ मध्ये बंकिमचंद्र यांनी क्रमशः 'आनंद मठ' नावाची कादंबरी लिहिली त्या कादंबरीमध्ये. २०२५ मध्ये वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त अनेकांनी नवनवीन रचना केल्या, गीते लिहिली, लेख लिहिले, भाषणे केली. याच मालिकेत भर घातली ती सांगली येथील सौ. विनिता तेलंग यांनी. 'आनंद मठ' या कादंबरीवर त्यांनी 'संगीत आनंद मठ' या नाटकाची रचना केली आहे. या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग पाहण्याची संधी नुकतीच मिळाली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंदिर येथे दिनांक २६ ऑगस्ट २०२६ या दिवशी 'वंदे मातरम् सार्धशती समितीच्या' वतीने या नाटकाचा विशेष प्रयोग करण्यात आला. त्या दिवशी हे नाटक पाहण्याची संधी मिळाली.
हे कथानक घडते १७७० च्या बंगालमधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर. बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले बस्तान बसवले आहे मीर जाफर याचे राज्य चालवण्याची, शेत सारा वसूल करण्याची जबाबदारी कंपनी सरकारने उचलली आहे. दुष्काळामुळे लोकांची अनान्न दशा झाली आहे. परंतु कंपनीचा नोकरवर्ग जनतेवर अनन्वित अत्याचार करून शेतसारा गोळा करीत आहेत. याला आळा घालण्यासाठी आनंदमठामध्ये अनेक देशभक्त नागरिक गोळा होतात. त्यांना प्रेरणा देणारे देणारे स्वामी सत्यानंद हे स्वतः संन्याशी आहेत. परंतु बंगालची बिकट परिस्थिती ओळखून ते गृहस्थ तरुणांना आवाहन करतात की काही काळ घर संसार यापासून दूर राहून सशस्त्र लढा देऊन कंपनी सरकारची जुलमी राजवट संपवली पाहिजे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊ शेकडो तरुण या मठात गोळा होतात. त्यांना शस्त्रसज्ज करून ,प्रशिक्षण देऊन कंपनी सरकारच्या ताब्यात असलेला बंगालचा मोठा प्रदेश स्वतंत्र करण्यामध्ये यश मिळवतात. या सर्व तरुणांना संतान असे संबोधले आहेत. नाटकाच्या शेवटी पूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य दीर्घकाळ राहील पण भारतभूमीची लेकरे तिला स्वतंत्र करतील असे भाकीत वर्तवले आहे. असे साधारण या नाटकाचे कथानक आहे.
या कथानकामध्ये नाट्यमय प्रसंग भरपूर आहेत. सौ विनिता तेलंग यांनी आपल्या लेखणी द्वारे अतिशय प्रभावी शब्दांमध्ये ते लिहिले आहेत त्याचबरोबर प्रसंगाला साजेशी गाणी देखील त्यांनी लिहिलेली आहेत. या नाटकाचे दिग्दर्शन पुण्यातील प्रसिद्ध दिग्दर्शक श्री रवींद्र सातपुते यांनी केले आहे. तर संगीत दिग्दर्शक म्हणून श्री. अजय पराड यांनी चाली दिल्या आहेत. १७७० चा काळ उभा करण्यासाठी यथोचित वेशभूषा आणि नेपथ्य तयार केले गेले आहे. नाटकात गीतांची संख्या पुष्कळ आहे. पराड यांनी गीतांना प्रसंगाणू वेगवेगळ्या चाली दिल्या आहेत एक गीत बंगाली भाषेत देखील आहे. ही सर्व गीते तरूण स्त्री पुरुष कलाकारांनी आपल्या सुरेल, दमदार आवाजात सादर केली. काही गाण्यांना 'वन्स मोअर' देखील मिळाले. काही प्रेक्षकांना ही गीते ध्वनीमुद्रित आहेत की काय अशी शंका आल्याने ती प्रत्यक्ष गायली गेली असा खुलासा श्री सातपुते यांनी प्रयोगाच्या शेवटी केला. गेली २५ पेक्षा अधिक वर्षे 'वंदे मातरम्' या विषयाचा ध्यास घेऊन संशोधन आणि अभ्यास करणारे श्री मिलिंद सबनीस यांचे विशेष मार्गदर्शन या नाटकाला लाभले आहे. 'वंदे मातरम्' सार्ध शती समितीचे डॉ.संजय तांबट, श्री संजय भंडारे आणि त्यांचे सहकारी यांचे प्रयत्न मोलाचे आहेत.
प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांचे चिरंजीव श्री वज्रांग आफळे, मित्र श्री प्रवीण महामुनी यांचे चिरंजीव श्री.प्रत्युष महामुनी, मित्र श्री संजय भंडारे यांची कन्या कु. सेजल भंडारे यांनी त्या दिवशी प्रयोगात भूमिका केल्या. श्री.वज्रांग याला बघून तरुणपणीचे आफळेबुवा असेच दिसत असावेत हे लक्षात आले. आफळे पतीपत्नीदेखील प्रयोगाला उपस्थित होते. आमचा विद्यार्थी श्री. देवांग शितूत हा तालवाद्य वाजवत होता.
जवळपास १०० कलाकारांनी या नाटकात वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. प्रमुख कलाकारांचा अभिनय खूप चांगला वठला आहे. समूह प्रसांगात सहभागी असणाऱ्या कलाकारांच्या हालचाली समन्वित पद्धतीने झाल्या आहेत. लढायांचे प्रसंग गतिमान आणि आवेशपूर्ण आहेत. नाटकातील संवाद मराठी, हिंदी इंग्रजी आणि मोजक्या वेळा बंगालीत आहेत. सर्वबाजूंनी उत्तम असलेल्या या नाटकाने त्यादिवशी प्रेक्षणांना एक विलक्षण अनुभव दिला. हा प्रयोग खूप आवडला.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


हा ब्लॉग वाचल्यानंतर केंव्हा एकदा नाटक जाऊन पाहतो असे झाले आहे. अतिशय मोजक्या शब्दात सुंदर रसग्रहण.
ReplyDeleteधन्यवाद सर
डॉक्टर नमस्कार आणि आभार!
Deleteतुम्ही लिहिलेला लेख खूप माहितीपूर्ण आणि भावपूर्ण झाला आहे. वंदे मातरम् च्या इतिहासापासून ते नाटकाच्या अनुभूतीपर्यंत तुम्ही छान प्रवास घडवला आहे.
ReplyDeleteसर धन्यवाद
ReplyDelete