उदार मनाचे शिक्षक

     माणसे जगण्यासाठी विविध व्यवसाय अथवा नोकऱ्या करतात. यातून अर्थ प्राप्ती होते. ही महत्त्वाची असते. यातील काही पेशांना समाजात आदराचे स्थान दिले जाते. त्यातील एक म्हणजे शिक्षकी पेशा. शिक्षकी देशामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचे परस्पर संबंध हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. या यामध्ये शिक्षक हे नेहमी वयाने विद्यार्थ्यांपेक्षा मोठे असतात त्यामुळे त्यांच्यावरची जबाबदारी ही जास्त असते. ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या दोन शिक्षकांच्या आयुष्यातील हे प्रसंग.

                        (श्री ललितदादा पाठक)

         १९६८-७० मधील गोष्ट आहे. नंदुरबारवरून धुळ्याला अद्यापक विद्यालयात शिकण्यासाठी आलेला ललित पाठक हा विद्यार्थी एके रात्री आपली दैनंदिनी लिहायला बसला होता. तो आज अतिशय संतापात होता. त्या संतापाच्या घरात आपल्या दैनंदिनित त्याने वाक्य लिहिले, " जर माझ्याकडे चाकू असता तर मी प्राचार्य  पाटील यांना भोकसले असते." असे लिहिण्याचं कारण काय होतं? तर त्यादिवशी रस्त्यावरून जाणाऱ्या  मळके कपडे घातलेल्या एका वृद्ध माणसाची अध्यापक विद्यालयात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी टिंगलटवाळी केली होती. कडक शिस्तीचे असणारे प्राचार्य ह. सु. पाटील यांनी चौकशी केली. टिंगल कुणी केली याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीही विद्यार्थी कबूल झाला नाही. त्यामुळे पाटील सरांनी सर्वच विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले आणि त्या सर्वांना ते कठोर शब्दांमध्ये रागावले.याच मुलांमध्ये ललितदेखील होता.

     ललितचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते .गांधीवादी चळवळीत  सहभागी होते. विद्यार्थी दशेत असताना वडिलांनी १९४२ च्या आंदोलनात कारावासदेखील भोगला होता. ललितदेखील सौम्य प्रकृतीचा, शांत विद्यार्थी होता. परंतु आपली काहीही चूक नसताना प्राचार्य रागावले याचा त्याला खूप संताप आला होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने हे वाक्य लिहिले होते. पुढे काही दिवसांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पाटील सरांनी विचारले की , "तुमच्यापैकी कोण कोण दैनंदिनी लिहिते?" त्यावेळी ललित याने हात वर केला. पाटील सरांनी सांगितले की , "तुझी दैनंदिनी मला वाचायला दे." त्यावेळी ललित म्हणाला , "मी जे लिहिले आहे ते वाचून तुम्ही रागवाल आणि मला शिक्षा कराल." पण पाटील सरांनी त्याला वचन दिले की , "मी असे काही करणार नाही." मग ललितने आपली दैनंदिनी पाटील सरांना वाचायला दिली. पाटील सरांनी ती दैनंदिनी वाचली. अर्थात चाकूचा उल्लेखदेखील वाचला. पण पाटीलसरांनी आपले दिलेले वचन पाळले. ललितला प्रेमाने समजून घेतलेआणि समजावून सांगितले. हेच ललितदादा पाठक पुढे शिक्षक झाले . नंदुरबारच्या पश्चिम खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कमला नेहरु कन्या विद्यालय, नंदुरबार आणि कन्या विद्यालय, देवपूर, धुळे. या दोन शाळांमध्ये त्यांनी दीर्घकाळ अध्यापन केले. उदार मनाचे शिक्षक म्हणून ललितदादा पाठक यांनी विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली. अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावरती ललितदादा पाठक यांच्या वागण्याचा, बोलण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा ठसा निश्चितच उमटला आहे. याचबरोबर ललितदादांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिक्षक संघटना अशा अनेक संस्था संघटनांमध्ये जबाबदारी घेऊन काम केलेले आहे.

( म.ए.सो.मुलांचे विद्यालय पुणे येथील जगताप सर यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमात बोलताना श्री बबन पोतदार, मागे मास्क लावलेला मी🙂)

    सुमारे ५० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दिवाळीची सुट्टी संपली होती. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मसूर गावच्या शाळेत शिक्षक असणारे नाना जगताप हे शिक्षक इयत्ता नववीच्या वर्गात शिरले‌. सुट्टीपूर्वी सहामाही परीक्षा झाली होती. त्याच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका नानांनी सर्वांना वाटल्या. मुलांच्या शंका , प्रश्न होते त्यांना उत्तरे दिली. नंतर नाना म्हणाले, "बबन, कुठं आहे?" बबन उभा राहिला. नानांनी त्याला पुढे बोलावले. उंचीने लहान असलेल्या बबनला त्यांनी बाकावर उभं राहायला सांगितलं. आता नाना काय करतात म्हणून सर्व विद्यार्थी विचार करू लागले. बबनच्या मनातही धाकधूक होती. नाना बोलू लागले, " तुम्हाला परीक्षेत व्यक्तिचित्र लिहा असा प्रश्न होता. बबनने माझंच व्यक्तिचित्र लिहिले आहे. त्यात त्याला आवडणाऱ्या माझ्या गोष्टी लिहिल्या आहेतच पण जे काही खटकतं तेही लिहिलं आहे. व्यक्तिचित्र लिहिताना कसं लिहायचं हे मी सांगितलं होतं तसंच लिहिलं आहे. शाब्बास, बबन!" असं म्हणून नानांनी बबनला प्रेमाने कवटाळले आणि ते म्हणाले , " बबन, तू मोठेपणी चांगला लेखक होशील." ह्या प्रसंगातील श्री बबन पोतदार पुढे साहित्यिक झाले. कथा , कादंबऱ्या, चित्रपट पटकथा असे विपुल लेखन त्यांनी केले.

        दोन्ही प्रसंगातील शिक्षकांनी त्यांच्याबद्दल आपापल्या विद्यार्थ्यांना समजून घेतले. दोन्ही विद्यार्थ्यांनी आपापल्या शिक्षकांची चूक किंवा त्रुटी दाखवून दिली होती. पण या उदार हृदयाच्या शिक्षकांनी ते मनावर न घेता प्रोत्साहन दिले.

सुधीर गाडे पुणे 

(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


Comments

Popular posts from this blog

सामाजिक जाणिवेतून कृती करणाऱ्या व्यक्तिंची आनंददायक भेट

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न