शिक्षकांकडून हे शिकू नका!
शिक्षणाच्या प्रक्रियेत शिक्षकांचे वागणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. शिक्षकदेखील माणूसच असतात. त्यामुळे त्यांचे वागणे परिपूर्ण असेलच असे सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे चांगले आचरण तेवढेच अनुसरावे अशी अपेक्षा असते. हीच अपेक्षा भारतातील प्राचीन ज्ञान परंपरेच्या उपनिषद ग्रंथात व्यक्त केली आहे. तैत्तिरीय उपनिषद आहे. त्यात एक शिक्षावल्ली नावाचा अध्याय आहे. त्याच्यात पुढील उतारा आहे.
आचार्य विद्यार्थ्यांना उपदेश करताना सांगतात'यानि अस्माकम् सुचरितानि| तानि सेवितव्यानि| न इतराणि||'
याचा अर्थ असा की आमच्या फक्त चांगल्या गुणांचे अनुकरण करा . इतर गुणांचे म्हणजेच दोषांचे नव्हे.
पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी ही शिक्षणक्षेत्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण संस्था आहे. त्या संस्थेचे अगदी सुरुवातीच्या काळापासून ज्यांनी शिक्षक म्हणून काम केले अशा कै. यशवंतराव लेले यांचे बोलण २०१२-१३ मध्ये ऐकले होते. त्यावेळी त्यांनी एक मुद्दा मांडला होता. ' शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अनेक गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपल्याकडून विद्यार्थी कळत नकळत काय शिकतात ह्याकडे लक्ष आहे का?' यशवंतरावांचे वाक्य मनाला अगदी जाऊन भिडले होते. जणू शब्दरूप टोचणीच! शिक्षकांच्या कोणत्या गुणांचे अनुकरण करु नये हे सांगणारे प्रसंग या लेखात दिले आहे.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ दिवंगत जयंतराव नारळीकर यांनी 'चार नगरातील माझे विश्व ' हे आत्मचरित्र लिहिले आहे. जयंतरावांचे वडील बनारस हिंदू विद्यापीठात प्राध्यापक होते. सोयीचे म्हणून जयंतरावांना त्यांच्या घराजवळच्या शाळेत दाखल केले होते. या शाळेत मॅट्रिक परीक्षेचे केंद्र नव्हते. ते शहरातील दुसऱ्या शाळेत होते. त्या शाळेतील विद्यार्थी दरवर्षी मॅट्रिक परीक्षेत पहिला येई असा तोपर्यंतचा इतिहास होता. पण जयंतरावांंच्या हुशारीची माहिती या दुसऱ्या शाळेतील शिक्षकांना मिळाली. तेव्हा आतापर्यंतची वाटचाल तशीच चालू राहावी म्हणून त्या शाळेतील शिक्षकांनी जयवंतरावांना प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुण दिले. याचा परिणाम एवढाच झाला की जयंतराव राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अर्थातच शहरात ते पहिले आले होतेच. जयंतरावांनी पुढे इंग्लंडमध्ये जाऊन भौतिकशास्त्रात मूलभूत संशोधन केले. नंतर भारतात परत येऊन सुरुवातीला मुंबईत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत कार्य केले. नंतर सरकारच्या निमंत्रणावरून पुण्यात येऊन विज्ञान संशोधन आणि प्रसाराला वाहिलेल्या 'आयुका' या संस्थेची उभारणी केली.
(डॉ.यशवंतराव वाघमारे यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
दुसरा प्रसंग आमच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी दीर्घकाळ काम केले अशा कै.यशवंतराव वाघमारे यांच्या आयुष्यातील आहे. यशवंतराव वाघमारे हे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते. दीर्घकाळ त्यांनी कानपूर आयआयटीमध्ये वरिष्ठ पदावर कार्य केले. ते शाळेत शिकत असताना त्यांनी एकदा त्यांच्या शिक्षकांना अणुच्या संरचनेबाबत प्रश्न विचारला. त्यावर विद्यार्थ्याला समजावून सांगण्याऐवजी ते म्हणाले, "तू लहान आहेस. तुला कळणार नाही." यशवंतराव म्हणाले, "हे ऐकून मी मनात निश्चय केला की मोठेपणी अणुचाच अभ्यास करणार." यशवंतराव यांनी ते खरे करून दाखवले. आपल्या पीएचडीचा अभ्यास त्यांनी नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञ मारिया मायर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला. पुढे त्यांनी अणुशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवला. अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या शिक्षकांनी कमीपणा दाखवणारे विधान केले. त्याचा परिणाम म्हणून यशवंतरावांनी नाउमेद न होता निश्चय केला आणि तो सत्यात साकारता.
(चैत्रामभाऊ पवार यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा या गावात ज्यांनी ग्रामविकासाचा उत्तम प्रयोग साकारला ते सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैत्राम पवार यांनीदेखील असाच एक प्रसंग अनुभवला. त्यांचे गाव दुर्गम डोंगरात होते. म्हणून त्यांना तालुक्यातील एका गावातील माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. वसतिगृहात राहून शिकावे लागले. ते इयत्ता दहावीत गेले तेव्हा शाळेतील एका शिक्षकांनी सांगितले, "जो विद्यार्थी माझ्या शेतावर दिवाळीच्या सुट्टीत काम करील त्यालाच मी उत्तीर्ण व्हायला मदत करणार." पण शिक्षकांच्या असल्या दबावाला चैत्रामभाऊ यांनी दाद दिली नाही. ते म्हणाले, "मी माझ्या अभ्यासावर उत्तीर्ण होईन." उत्तीर्ण होण्याची जिद्द त्यांनी बाळगली. वसतिगृहात रूपचंद बापू नावाचे पर्यवेक्षक होते. चैत्रामभाऊ रात्री जागून पहाटे उठून अभ्यास करताना त्यांना दिसत त्यावेळी रूपचंद बापूंनी त्यांना धीर दिला. दहावीत ऐकत असलेल्या सोळा विद्यार्थ्यांपैकी केवळ दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये चैत्रामभाऊ एक होते. पुढे चैतरामभाऊ यांनी आपले आयुष्य गावाच्या विकासासाठी वाहिले. बारीपाड्याच्या विकासाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या पुरस्कारांनी घेतली गेली.

या तीनही उदाहरणामधील व्यक्तिंनी शिक्षकांच्या चुकीच्या वर्तनाचा आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ न देता आयुष्यात लक्षणीय प्रगती केली. पण प्रत्येक विद्यार्थ्याला हे जमेलच असे नाही. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या वागण्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांला अनुकरण करता येईल असे ठेवले पाहिजे.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments
Post a Comment