मला जाणवलेली माझी गरीबी

 "आपण किती गरीब आहोत?" माझ्या मनात प्रश्न उमटला. यापूर्वी ही भावना मनात कधी आली नव्हती. आज मात्र गरीबीचा भाव मनात दाटून आला होता. यापूर्वी अशा परिस्थितीत हुरुप वाटायचा. उत्साह यायचा पण आज ही भावना मनामध्ये पहिल्यांदाच आली होती. थोडासा चमकलो. पण नंतर लक्षात आलं की बरोबरच आहे. "आहोतच आपण गरीब!"


           (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने काढलेले चित्र)

सुमारे दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. नाशिकला गेलो होतो. तेव्हा तिथल्या एका ग्रंथप्रदर्शनात गेलो. प्रदर्शनात इंग्रजी आणि मराठी भाषेतील हजारो पुस्तके मांडून ठेवलेली होती. त्यापैकी काहीच पुस्तके यापूर्वी वाचलेली होती तर काही पुस्तके बघितलेली होती किंवा त्याबद्दल काही माहिती तरी होते. त्यामुळे एकदम मनात विचार आला की, "ग्रंथ ही संपत्ती आहे. पण आपणतर आजपर्यंत वाचलेली पुस्तके अनेक असली तरी इथल्या हजारो पुस्तकांच्या तुलनेत ती कमीच आहेत. आणि जगातील एकूण पुस्तकांचा विचार केला तर ती फारच अल्प आहेत. ग्रंथश्रीमंतीच्या बाबतीत आपण गरीब आहोत." हाच तो माझ्या गरीबीबाबतचा माझा विचार.
        आमचे वडील कै. शिवलिंग गाडे यांना पुस्तक वाचनाची फारशी आवड नव्हती. पण रोजचे वर्तमानपत्र मात्र ते नियमितपणे वाचत. 'शामची आई' हे त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे वाचलेले एकमेव पुस्तक. आमची आई गं.भा.नंदा गाडे हिच्याकडून पुस्तकवाचनाची आवड मी आणि माझा छोटा भाऊ या दोघांमध्ये उतरली आहे. साधारणपणे शब्दांकडे माझे लक्ष जास्त चटकन वेधले जाते. समोर एकाचवेळी एखादे चित्र आणि काही मजकूर दिसत असेल तर माझे लक्ष शब्दांकडे जास्त वेधले जाते हा माझा नेहमीचा अनुभव आहे.
अगदी लहानपणापासून मी पुस्तकं वाचत आलो आहे. नवीन पुस्तक मिळाले की ते कधी एकदा वाचून होते आहे असे मला होते. साताऱ्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना मी तिथल्या नगर वाचनालयाचे सभासदत्व घेतले होते. एकदोन वेळा सकाळी घेतलेले पुस्तक बदलण्यासाठी म्हणून मी संध्याकाळी गेल्याचे आठवते. पण घेतलेले पुस्तक त्याच दिवशी परत करता येत नाही असा नियम असल्याने दुसऱ्या दिवशी परत करावे लागले.
       पुस्तक वाचायला लागलो की सर्व लक्ष पुस्तकाकडे असं माझं बरेचवेळा होते. लहानपणी एकदा मी आमच्या दुकानात वाचत बसलो होतो. परिचयाचे एकजण येऊन उभे राहिले. काही मिनिटे तशीच गेली पण मला ते आल्याची जाणीव झाली नाही. शेवटी त्यांनी हाक मारली तेव्हा माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं. असेच अनुभव अजून काही वेळा आले.
       कथा, कादंबऱ्या,नाटक,‌चरित्र, आत्मचरित्र, ऐतिहासिक, वैज्ञानिक कथा अशा अनेक प्रकारच्या पुस्तकांचं मी वाचन केले आहे. अमुक एक प्रकारची अशी पुस्तके वाचली नाहीत. स्वैर, स्वांतसुखाय अशा प्रकारचे माझं वाचन आहे. माझ्या परिचयातील एक जण आहेत त्यांचे एकदम शिस्तबद्ध पद्धतीने वाचन चालते. एखादा लेखक घेऊन ओळीने त्याची पुस्तके वाचत जायची असा त्यांचा शिरस्ता आहे. मला मात्र तसे जमत नाही. जे मिळेल किंवा आवडेल किंवा कोणी सुचवले तसं मी वाचत जातो.
        एखादे पुस्तक वाचत असताना त्यातील काही प्रसंग किंवा मुद्दे सहज लक्षात राहतात. काही गोष्टी विसरल्या जातात. यासाठी पुस्तक वाचताना त्याची टिपणे काढावी लागतात. त्याचा उपयोग होतो. पण टिपण काढायला लागले की वाचनाची गती मात्र मंदावते. त्यामुळे टिपण न काढण्याकडे कल होतो. अजून एक करता येते ते म्हणजे एखादे पुस्तक वाचून झाले की त्यात काय लिहिले आहे ते कुणालातरी सांगायचे‌. उजळणी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
        वाचणाऱ्याची एकाग्रता, सराव आणि ब्रम्हचर्य या तीन बाबी असतील तर तो गतीने वाचू शकतो असे स्वामी विवेकानंद यांनी म्हटले आहे. स्वामीजींच्या चरित्रात स्वामीजी किती झपाट्याने वाचू शकत असत याचे किमान तीन प्रसंग त्यांचे गुरुबंधू आणि शिष्य यांनी लिहून ठेवले आहेत. स्वामीजींच्या म्हणण्याला त्यांच्या स्वानुभवाचा आधार आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनादेखील झपाट्याने वाचण्याची कला अवगत होती असे मी एका प्रसिद्ध अभिनेत्याकडून बऱ्याच वर्षांपूर्वी ऐकले आहे. त्यामुळे या दोन्ही महापुरुषांनी हजारो ग्रंथ वाचलेले होते. तुलनेने माझं वाचन कमी आहे.
          पण माझी ही गरीबी कमी करण्यासाठी काहीजण प्रयत्न करत असतात. काही कार्यक्रमाच्या किंवा इतर काही निमित्ताने ते मला पुस्तक भेट देतात. मग वाचण्याच्या यादीत अजून काही भर पडते. मी गमतीने म्हणतो की "जसे लोहचुंबक लोखंड आकर्षून घेते तसा मी पुस्तकचुंबक आहे. पुस्तके माझ्याकडे आकर्षित होतात. चालत येतात." असा हा गरीब असल्याचा अनुभव.

सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. सूंदर अनुभव आदरणीय सरजी

    ReplyDelete
  2. प्राचार्य विकास काकडे यांनी लिहिले आहे.
    मी ज्यावेळी बळवंत कॉलेज विटा येथे प्राध्यापक म्हणून लागलो तेव्हा आपण ज्या स्पीडने व उत्साहाने आपण लहानपणी वाचन करत होता त्याच प्रमाणे मी वाचन करत होतो. नंतर पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समिती मध्ये तीन वर्ष लायब्ररीमध्ये लायब्रियन म्हणून तीन वर्षे काम करत होतो त्यावेळी प्रचंड वाचन केले याची आठवण झाली.

    ReplyDelete
  3. डॉ विकास इनामदार यांनी लिहिले आहे.
    पुण्यात डोईफोडे दांपत्याने वाचन संस्कृतीचा जागर करण्याच्या उद्दिष्टाने 2016 साली सुरु केलेल्या "विनया 'चल' ग्रंथालयाचे" मी सदस्यत्व घेतले आहे. त्यांचे एकूण 750 सदस्य असून दरवर्षी ते वाचक मेळावा घेतात. या वर्षी तो गोळवलकर प्रशालेच्या वातानुकूलित सभागृहात झाला. दोन-अडीचशे वाचक उपस्थित होते. हे 'फिरते' ग्रंथालय असून आपल्या आवडीची पाच पुस्तके महिन्याकाठी आपल्याला वाचायला ते घरपोच आणून देतात. त्यांच्या संग्रहात विविध विषयांवरील चार हजार पुस्तके आहेत. त्यामुळे माझे चौफेर वाचन होत असते. तसेच रोज मी चार वर्तमानपत्रे घेतो. त्यांचे ही नियमित वाचन होते. वाचन,मनन, चिंतन, टिपण,लेखन, निरीक्षण, श्रवण यातून ज्ञानवृद्धि होते. विदा, माहिती, ज्ञान, कौशल्ये, बारकावा, शहाणपण, दूरदृष्टी हे ज्ञानसंकलनातील सात टप्पे आहेत.

    ReplyDelete
  4. प्रसिद्ध कवयित्री सौ. अंजली कुलकर्णी यांनी लिहिले आहे.
    अरे वा खूपच सुंदर लिहिले आहे.
    सर, कविता वाचायला आवडतात का तुम्हाला ? माझे एखादे पुस्तक मी तुम्हाला नक्की देईन.😊🙏

    दुसरे म्हणजे तुम्ही म ए सो च्या संचालक मंडळात आहात. मी रेणुका स्वरूपची विद्यार्थिनी आहे.
    आमच्या शाळेचे ग्रंथालय फार समृद्ध होते. तिथे कितीतरी गोष्टींची पुस्तके मधल्या सुट्टीत बसून मी वाचली आहेत.🙏

    ReplyDelete
  5. श्री राजेंद्र जोशी यांनी लिहिले आहे.
    वाचनाने माणूस प्रगल्भ होतो . विचार करायची सवय होते व त्याद्वारे मेंदू कार्यरत राहतो .
    कमी वाचन म्हणजे गरीबीच.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सामाजिक जाणिवेतून कृती करणाऱ्या व्यक्तिंची आनंददायक भेट

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न