आयुष्यात अनेक उत्तरे बरोबर
गणित या विषयामध्ये बहुतेक उदाहरणांसाठी एकच उत्तर बरोबर असते. पण आयुष्य हे मात्र गणितापेक्षा खूप वेगळे आणि गुंतागुंतीचे असते. परिस्थिती साधारपणे सारखीच असली तरीही असलेल्या प्रश्नाची अनेक उत्तरे असू शकतात आणि ती बरोबरदेखील असू शकतात. चूक बरोबर हे त्या त्या व्यक्तिच्या विचारांवर , ती व्यक्ती आयुष्यात कशाला जास्त महत्त्व देते या गोष्टींवर अवलंबून असते. याचीच काही उदाहरणे या लेखात दिली आहेत.
(डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
ज्ञानकोश ही प्रचंड आवाका असणारी संदर्भ ग्रंथांची मालिका स्वतःच्या अभ्यासाने, सततच्या परिश्रमाने प्रसिद्ध करणारे आणि वेळप्रसंगी मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जाणारे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जीवनकाळ १८८४-१९३७ असा आहे. सुरुवातीला अमरावती, नंतर विल्सन महाविद्यालय मुंबई येथे आपले शिक्षण पूर्ण करून केतकरांनी अमेरिकेत कॉर्नेल विद्यापीठात विद्यावाचस्पती (पीएचडी) ही पदवी संपादन केली. भारतात येऊन कोलकाता विद्यापीठात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९२० मध्ये त्यांनी जर्मन ज्यू असणाऱ्या कु. इंडिथ व्हिक्टोरिया कोहेन यांच्याशी विवाह केला. एडिथ यांनी हिंदू धर्माचा अंगिकार केला. शीलवती हे नाव त्यांना मिळाले. ज्ञानकोशाच्या निर्मितीसाठी केतकरांनी आपल्या उत्तरायुष्यात प्रचंड परिश्रम केले. त्यांचे निधन झाले तेव्हा हे कार्य पूर्ण झाले नव्हते. केतकर यांच्या मृत्यूनंतर शीलवती यांनी भारतात राहूनच आपलं आपल्या पतीचे कार्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला. शीलवती केतकर यांनी आपल्या उत्तरायुष्यात ज्ञानकोश प्रकल्पाचेच काम शेवटपर्यंत केले.
(बॅ. नाथ आणि क्रिस्टल पै यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
बॅ. नाथ पै यांनी १९५७ ते १९७१ अशी चौदा वर्षे लोकसभेचे खासदार म्हणून कार्य केले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, संसदीय नियमांचा वापर करून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवला. १९२२ ते १९७१ असा जीवनकाळ असलेल्या समाजवादी विचारांच्या पै यांचा विवाह व्हिएन्ना येथील कु.क्रिस्टल मुशेल यांच्याशी झाला. या विवाहानंतर क्रिस्टल भारतात राहून पै यांच्या कार्यात सहभागी झाल्या. १९७१ मध्ये पै यांचे अकाली निधन झाल्यानंतर क्रिस्टल यांनी पै यांच्या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. यानंतर आपल्या वृद्ध आईच्या सोबत राहण्यासाठी क्रिस्टल पै आपल्या दोन मुलांसह परत आपल्या मायदेशी गेल्या.
शीलवती केतकर आणि क्रिस्टल पै या दोघींवरही त्यांचा मायदेश नसलेल्या भारतात पतीच्या अकाली मृत्युच्या घटनेला सामोरे जाण्याचा प्रसंग आला. पण या एकसारख्या प्रसंगात दोघींचाही निर्णय वेगवेगळा होता.
बॅ. नाथ पै यांनी १९५७ ते १९७१ अशी चौदा वर्षे लोकसभेचे खासदार म्हणून कार्य केले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, संसदीय नियमांचा वापर करून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवला. १९२२ ते १९७१ असा जीवनकाळ असलेल्या समाजवादी विचारांच्या पै यांचा विवाह व्हिएन्ना येथील कु.क्रिस्टल मुशेल यांच्याशी झाला. या विवाहानंतर क्रिस्टल भारतात राहून पै यांच्या कार्यात सहभागी झाल्या. १९७१ मध्ये पै यांचे अकाली निधन झाल्यानंतर क्रिस्टल यांनी पै यांच्या मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहण्याच्या प्रस्तावाला नकार दिला. यानंतर आपल्या वृद्ध आईच्या सोबत राहण्यासाठी क्रिस्टल पै आपल्या दोन मुलांसह परत आपल्या मायदेशी गेल्या.
शीलवती केतकर आणि क्रिस्टल पै या दोघींवरही त्यांचा मायदेश नसलेल्या भारतात पतीच्या अकाली मृत्युच्या घटनेला सामोरे जाण्याचा प्रसंग आला. पण या एकसारख्या प्रसंगात दोघींचाही निर्णय वेगवेगळा होता.
(डॉ. राम आणि सुनीता गोडबोले यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
यावर्षी भारत सरकारने बस्तरमध्ये जनजातीय बांधवांची प्रदीर्घ काळ सेवा करणारे डॉ.राम गोडबोले आणि सौ. सुनीता गोडबोले यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. मूळचे सातारचे असलेले डॉ. राम गोडबोले हे बी.ए.एम.एस. ही पदवी घेतल्यानंतर वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात आले. नाशिक जिल्ह्यात जनजातीय बांधवांची सेवा करत असताना कु. सुनीता पुराणिक यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सुनीताताई या लहानपणापासून वनवासी कल्याण आश्रमाच्या संपर्कात होत्या. जनजातीय बांधवाची सेवा करेल असाच कार्यकर्ता त्यांना जोडीदार म्हणून हवा होता. तो राम गोडबोले यांच्या रुपाने त्यांना भेटला. विवाहानंतर लगेचच नवपरिणित दांपत्य बस्तरमध्ये बारसूर या गावी दाखल झाले आणि सेवा कार्याला सुरुवात झाली. याच दरम्यान राम गोडबोले यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले होते. घरी त्यांचे वडील एकटेच होते. वडिलांच्या सोबत राहयचे की कार्यक्षेत्रात जायचे या प्रश्नाचे राम गोडबोले यांनी कार्यक्षेत्र हे उत्तर निवडले. गेली अनेक दशके सुरू असलेल्या त्यांच्या या कार्याची उचित दखल यावर्षी सरकारने घेतली.
(मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि मेजर ऋषभ सिंग. यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशातील सर्वोच्च पद आहे. अशा पदावरील व्यक्तिची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असते. तसेच त्यांना अतिशय विश्वासू असा सहाय्यकाची आवश्यकता असते. या विश्वासू सहाय्यकाला एडीसी असे म्हणतात. भारतीय सैन्यदलातील अतिशय निवडक तरुण अविवाहित अधिकाऱ्यांची कडक परीक्षा घेऊन पात्र उमेदवाराची निवड केली जाते. काही वर्षांपूर्वी सैन्यदलातील मेजर ऋषभ सिंग संभ्याल यांची या पदावर काम करण्यासाठी निवड झाली. आताच्या विद्यमान राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत अतिशय कार्यक्षमपणे ऋषभ सिंग यांनी काम केले. ऋषभ सिंग यांच्या म्हणण्यानुसार मा. द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आईच्या मायेने वागवले. एकदा कार्यक्रम सुरू असताना अचानक पाऊस पडू लागला. तेव्हा ऋषभ सिंग यांनी चटकन छत्री मा. मुर्मू यांच्या डोक्यावर धरली. याबाबत विचारणा केली असता ऋषभ सिंग म्हणाले, "याचे कोणतेही वेगळे प्रशिक्षण अथवा सूचना त्यांना दिली गेली नव्हती. पण जर मी सोबत असताना माझी आई पावसात भिजू लागली असती तर मी जे केले असते तेच मी या प्रसंगी केले." आपल्या कामात चोख असणाऱ्या ऋषभ सिंग यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. याबाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, "लहानपणापासून मी सैन्यदलात काम करायचे ध्येय ठेवले होते. त्यासाठी आईवडिलांपासून वर्षानुवर्षे दूर राहून मी खडतर परिश्रम घेतले. सैन्यदलात प्रवेश मिळवला. राष्ट्रपतींचा एडीसी म्हणून समाधानाने काम केले. यासाठी अनेक वर्षे कुटुंबापासून दूर राहिलो. आता कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे."
डॉ. राम गोडबोले आणि मेजर ऋषभ सिंग संभ्याल या दोघांपुढचाही प्रश्न तोच होता. परिस्थितीही तशी सारखी म्हणता येईल. पण दोघांचाही निर्णय वेगवेगळा झाला. दोघांचाही निर्णय बरोबरच म्हणावा लागेल. हेच तर आयुष्याचे सौंदर्य आहे.
सुधीर गाडे पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)




Comments
Post a Comment