सामाजिक जाणिवेतून कृती करणाऱ्या व्यक्तिंची आनंददायक भेट

            गेल्या काही दशकांपासून आमच्या म.ए.सो. महाविद्यालयीन विद्यार्थी वसतिगृहात दरवर्षी 'सामाजिक रक्षाबंधन' हा उपक्रम घेण्यात येतो. यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तिंना आमंत्रित करण्यात येते. त्यांचे कार्य, अनुभव यांचा परिचय वसतिगृहात राहणाऱ्या मुलामुलींना करून देण्यात येतो. यावर्षी या उपक्रमामध्ये निवृत्त हवामान शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद मुजुमदार यांना बोलावण्यात आले होते.

(मध्यभागी टोपी घातलेले डॉ. मिलिंद मुजुमदार, त्यांच्या उजवीकडे श्री प्रशांत कुलकर्णी)

            वसतिगृहातील मुलामुलींनी मिलिंदराव यांची मुलाखत घेतली. त्यातून त्यांच्या कार्याची ओळख उपस्थितांना झाली. मूळचे खंडवा, मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेल्या मिलिंदराव यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीर्घकाळ पुण्यातील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरियॉलॉजी' (IITM) या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून काम केले आणि सुमारे दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाली. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाला व्हावा यासाठी मिलिंदराव सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यासाठी विविध ठिकाणी तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान याच्या नोंदी ठेवणे. त्यांचे विश्लेषण करून समाजाला उपयुक्त असा सल्ला देणे असा उपक्रम ते आपल्या अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने राबवतात. विशेषतः पुणे शहरात हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर चालतो. 

            निवृत्तीच्या वेळी मिलिंदरावांना पंढरपूरच्या वारीत सहभागी होण्याची प्रेरणा झाली आणि ते वारीत एका टप्प्यावर सहभागी झाले. त्या अनुभवाने त्यांना नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा झाली. सुरुवातीला बसने, नंतर कारने आणि अजून एकदा इलेक्ट्रिक सायकलवर त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. या परिक्रमेच्या वेळी महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यातील धावली पाडा येथे शिक्षण, पर्यावरण, उद्योजकता या वेगवेगळ्या विषयांवर काम  करणाऱ्या श्री. प्रशांत कुलकर्णी यांची भेट झाली. त्यांच्या कामात सहभागी होण्याच्या दृष्टीने त्या धावडीपाडा परिसरातील दहा ठिकाणी हवामानाचे वेगवेगळ्या घटकांची नोंद करणारे केंद्रे उभी करण्यासाठी मदत केली. जमीनीची धूप होऊन माती वाहून जाते याची जाणीव जागृत करण्यासाठी स्वतःच्या सॅकवर 'माटी बचाव' अशी घोषणा प्रशांतजींकडून सुवाच्य अक्षरात लिहून घेतली. परिक्रमेत जिथे जिथे शक्य झाले तिथे लोकांना माहिती दिली. तसेच तिसऱ्या परिक्रमेत विचारपूर्वक इ सायकलचा वापर केला.

         मिलिंदरावांचा अजून एक वेगळा पैलू म्हणजे ऊर्जा बचतीसाठी त्यांनी केलेले अनेक उपक्रम. आपल्या घरात एसी बसवण्याचे टाळून त्यांनी दोन्ही दिशेने फिरू शकणारे एक्झॉस्ट फॅन वेगवेगळ्या ठिकाणी बसवले आहेत. खिडकीच्या पडद्यांची वेगळी रचना केली आहे. याच बरोबर मोशन सेन्सर, लाईट सेन्सर बसवले आहेत. या सगळ्याचा वापर करून घरातील उर्जा वापरात ते चांगली बचत करतात.

   (डॉ. मिलिंद मुजुमदार यांच्या पिशवीतील वेगवगळी उपकरणे)

          मिलिंदरावांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांची एक पिशवी आहे. तिच्यामधील उपकरणांच्या सहाय्याने काय करता येते याचे लोकशिक्षण ते ठिकठिकाणी करतात. यातून ते समाजात जागृती करतात. मिलिंदरावांचे कार्य पाहून मला कवी दत्ता हलसगीकर यांच्या ओळींची आठवण झाली.

'ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावीत,

ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत

आभाळाएवढे ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे

मातीमध्ये ज्यांचे जन्म मळले त्यांना अलगद उचलून घ्यावे'

या ओळी शब्दशः जगणारे मिलिंदराव यांची भेट आनंद देऊन गेली.

      या मुलाखतीच्यावेळी योगायोगाने श्री. प्रशांत कुलकर्णी हेदेखील वसतिगृहात आले होते. सांगली जिल्ह्यातील सप्तर्षी कवठे या गावचे प्रशांतजी हे पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी. इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आयटीक्षेत्रात नोकरी केली. त्यात मोठे यश मिळवल्यानंतर आंतरिक ओढीने त्यांनी नर्मदा परिक्रमा चालत पूर्ण केली. या परिक्रमेत प्रशांतजी नर्मदेच्या काठाकाठाने चालत गेले. जवळपास ३६०० किमी अंतर त्यांनी पायी पूर्ण केले. या परिक्रमेत त्यांना वेगवेगळे विलक्षण अनुभव आले. या परिक्रमेच्या अनुभवावर त्यांनी 'https://mazinarmadaparikrama.blogspot.com/?m=1'                                                                             या नावाने ब्लॉग सुरू केला आहे. आध्यात्मिक प्रेरणेतून प्रशांतजींनी महाराष्ट्रात सहा सात ठिकाणी मंदिरांचे बांधकाम केले आहे.

          नर्मदा परिक्रमेत प्रशांतजींना 'शूलपाणी' परिसरात सावली देणारे वृक्ष नाहीत असे लक्षात आले. त्याभागातील एकजण मदत मागण्यासाठी त्यांच्याकडे आल्यावर 'नर्मदालय' चालवणाऱ्या आदरणीय भारती ठाकूर यांच्याकडे प्रशांतजी गेले. त्यावेळी भारतीजींनी , "तुम्हीच अशा प्रकारचे काम सुरू करा." ही सूचना मनावर घेऊन प्रशांतजींनी आपले कार्य सुरू केले.

      प्रशांतजींच्या कार्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. नर्मदा परिक्रमा मार्गावरील महाराष्ट्रातील पहिले गाव भाबरी नावाचे आहे . तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार येतो . इथे गेल्या दोन वर्षांपासून काही उपक्रम सुरू आहेत. गेली ३५ वर्षे परिक्रमावासींची सेवा करणारे श्री. फोदला गारद्या पावरा यांच्या गृहस्थ आश्रमातून सर्व सेवा सुरू आहेत .सर्वात महत्वाचे म्हणजे इथे सरकारी शाळा उपलब्ध नसल्यामुळे सुमारे अडीचशे मुले शिक्षणापासून वंचित होती. या सर्वांसाठी इथे मोफत आनंद शाळा चालवली जाते. रोज मुलांना आश्रमातर्फे भोजन दिले जाते. रोज सरासरी २०० ते कधी कधी ५०० परिक्रमावासी मुक्कामासाठी येतात. त्या सर्वांची मुक्कामाची भोजन प्रसादाचीही सोय केली जाते. परिसरात जलसंधारण आणि मृदा संधारणाची अनेक कामे आश्रमातर्फे सुरू आहेत. श्री नर्मदा माई देवराई नावाने २०००० झाडे लावून झालेली आहेत . ३८ लघु बंधारे, २ मोठे बंधारे, ७ विहिरी, २०००० लिटरची पाण्याची मोठी टाकी जनजातीय बांधवांसाठी पाण्याची सोय करत आहेत . गोबर गॅस प्रकल्प, सौरचूल व निर्धूर चूल, इ. लाकडे वाचवत आहेत . गावातील महिलांना शिवणयंत्रे शिकवली जातात व वाटली जातात. गावातील सर्व युवकांना त्यांच्या क्षमता बघून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते . व्यसनमुक्तीचे कार्य जोरात सुरू आहे . गावात अजूनही वीज आलेली नसल्यामुळे सौर विद्युत ग्रीड उभे करण्यात आले आहे .गावातील सर्व युवक युवतींना विद्युत जोडणी चे प्रशिक्षण दिलेले आहे . आश्रमाची सुसज्ज टूल रूम आहे . घर वापसीचे कार्यदेखील आपोआप साध्य होते आहे . 

शूलपाणी झाडीतील भाबरीच्या धावडी पाडा आश्रमाला मदत पाठविण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे . . .

बँकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया

शाखा : तळोदा ( जि. नंदुरबार )

खातेदाराचे नांव : श्री दिनेश फोदला पावरा ,

खाते क्र : ३५ ९८ २५ ९१ ७२२

Account number : 35982591722

सीआयएफ क्र : ८९१ ८३० ६४५५४

CIF number : 89183064554

IFSC Code: SBIN0010487

MICR Code : 42

(मदत केल्यावर त्याची माहिती पुढील आयडीवर कृपया कळवावी.

mazinarmadaparikrama@gmail.com)

आपणा सर्वांना मदतीचे नम्र आवाहन.

    प्रशांतजींची भेट झाल्यावर स्वामी विवेकानंद यांचे वचन आठवले, 

'Those only live who live for others.'

   मिलिंदराव आणि प्रशांतजी यांची भेट मला अतिशय आनंद आणि प्रेरणा देऊन गेली.

सुधीर गाडे पुणे 

( लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments

  1. अतिशय उत्तम लेख! विचार मांडण्याची पद्धत खूप प्रभावी आहे. 💐👍

    ReplyDelete
  2. वाह,, मनपूर्वक अभिनंदन 🎉 आणि पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा 🎉🎉🎉
    लेख आणि कार्य कर्तृत्व देशविणारे आहे.
    अश्याच नवविध संकल्पना आणि प्रकल्पासाठी अनंत शुभेच्छा 🎉🎉

    ReplyDelete
  3. उत्तम लेख, स्तुत्य उपक्रम

    ReplyDelete
  4. उत्तम लेख.... दोघांच्याही कार्यास सलाम. सर आपल्या लेखणीतून हे कार्यकर्ते आमच्या पर्यंत फोहाचले यातून इतरही प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्यास हातभार लावतील किंवा अशी अजून नवीन कामे सुरु होतील अशी अपेक्षा!

    ReplyDelete
  5. उत्तम लेख, सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम उदाहरण!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न