आईने केलेला नवस फेडण्यासाठी
'फुलात फूल जाईचे जगात प्रेम आईचे' असा सुविचार पूर्वी अनेक शाळांच्या फळ्यांवर, भिंतीवर लिहिलेला आढळत असे. आईचे प्रेम ही जगातील एक अद्भुत गोष्ट आहे. आईने आपल्या अपत्याला नऊ महिने पोटात वाढवलेले असते. त्यासाठी अनेक शारीरिक मानसिक वेदना सहन केलेल्या असतात. याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्यामुळे आईचे प्रेम हे निरपेक्ष असते. अपत्य हा आईच्या जीवाचा शब्दशः एक अंश असतो. आईला म्हणून देवाचे रूप मानले जाते.
'प्रेम देण्यासाठी आई निर्मिली ,आई हे देवाचे रूप
सर्वांठायी देव धावेल कसा, देवाला कामे ही खूप'
असे गीत स्वर्गीय गायिका लता मंगेशकर यांनी गायलेले आहे.
आपल्या अपत्यावर जिवापाड प्रेम करणारी आई अपत्याच्या सुखाने सुखावते आणि दु:खाने कष्टी होते. अपत्यावर संकट आले असेल तर ती ते संकट दूर करण्यासाठी वाटेल ते करायला तयार असते. अनेक प्रकारच्या संकटांपैकी एक संकट असते ते आजारपणाचे. आजारपणावर वेगवेगळे उपचार करून जर ते दूर होत नसेल तर देवावर श्रद्धा असणारी माणसे आपल्या दैवताला नवस करतात आणि आजारपण संपले की तो नवस फेडतात. आईने केलेला नवस फेडणाऱ्या दोन प्रसिद्ध व्यक्तिंच्या आयुष्यातील हे प्रसंग.
(नरहर कुरुंदकर यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)१९३२ ते १९८२ असे पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलेले नरहर कुरुंदकर हे विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे विचारवंत. अगदी लहानपणापासून ते तर्कशुद्ध पद्धतीने विचार करत असत. तर्काच्या आधारावर प्रश्नांचे उत्तरे देत असत. ते स्वतः नास्तिक होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांशी त्यांचे या मुद्द्यावर वादविवाद होत असत. आपले मामा ना.गो. नांदापूरकर यांच्याकडे हैदराबाद येथे शिक्षण घेत असताना वादविवादाचे असे अनेक प्रसंग आले. एका प्रसंगी तर मामांनी त्यांना तासभर घराबाहेर काढले. पण नंतर घरातही घेतले. असे तर्कशुद्ध विचार करणारे नास्तिक असणाऱ्या कुरुंदकर यांच्या आई गंगाबाई या मात्र धर्मश्रद्धा असणाऱ्या होता. पूजाअर्चा, व्रतवैकल्ये या सगळ्यावर त्यांचा विश्वास होता. या गोष्टी त्या नित्यनेमाने करत असत. नरहर कुरुंदकर शिक्षण पूर्ण करून नांदेडला आले. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या पीपल्स कॉलेजमध्ये ते प्राध्यापक झाले. नंतर ते प्राचार्यही झाले.
याच काळात एका गांधीवादी विचारवंतांनी सामाजिक सुधारणेसाठी उपोषण केले. नरहर कुरुंदकर हे त्यात सहभागी झाले. त्यानंतर मात्र त्यांना आजार झाला. आजाराने गंभीर स्वरूप धारण केले. वेगवेगळे उपचार होऊ लागले पण आजाराला उतार पडेना. अशावेळी नरहर कुरुंदकर यांच्या आई गंगाबाई यांनी त्यांचे गाव असणाऱ्या पोखर्णी येथील नृसिंहाला नवस केला, "माझ्या नरहरला चांगले बरे वाटू दे. मग त्याच्या हाताने तुला अभिषेक करेन." हा नवस बोलल्यानंतर काही दिवसांनी नरहर कुरुंदकर दुखण्यातून बरे झाले. आता आईने नवस पूर्ण करण्यासाठी नरहर कुरुंदकर यांच्या मागे लकडा लावला. नरहर कुरुंदकर यांची मोठी पंचाईत झाली कारण त्यांना देवाचे अस्तित्व मान्य नव्हते. त्यामुळे कर्मकांड, नवस ही तर फारच दूरची गोष्ट. पण शेवटी आईच्या इच्छेनुसार त्यांना गावी जाऊन अभिषेक करावा लागला. त्यासाठी त्यांच्यावर मोठी टीकादेखील झाली. पण आपल्या जन्मदात्या आईच्या समाधानासाठी नरहर कुरुंदकर यांनी आपल्या तत्त्वाला मुरड घातली.
(जगन्नाथ जोशी यांचे छायाचित्र इंटरनेटवरून साभार)
दुसरे उदाहरण आहे ते १९२० ते १९९१ असा जीवनकाळ असलेल्या जगन्नाथ जोशी यांचे. कर्नाटक येथील नरगुंद येथे जन्मलेल्या जगन्नाथ जोशी यांचे शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालय आणि स.प. महाविद्यालय येथे झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संपर्क आल्यावर ते संघाचे स्वयंसेवक झाले. १९५२ मध्ये जनसंघ हा पक्ष स्थापन झाल्यानंतर ते जनसंघाचे कार्य करू लागले. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला पण गोवा त्यानंतरही पोर्तुगीजांच्या गुलामगिरीत होता. याविरोधात 'गोवा मुक्ती संग्राम' लढवण्यात आला. या गोवा मुक्ती संग्रामात भाग घेऊन जगन्नाथ जोशी यांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यांना पकडून तुरुंगात डांबण्यात आले. पोलिसी अत्याचार त्यांना सोसावे लागले. १९६१ मध्ये गोवा स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य सैनिक म्हणून देऊ केलेल्या सोयीसुविधा त्यांनी नाकारल्या. त्यानंतर १९६७ आणि १९७१ अशा दोन वेळा ते जनसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. आपल्या वक्तृत्वाने त्यांनी सरकारवर टीका केली. १९७६ नंतर ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले.
जगन्नाथ जोशी यांचे आपल्या आई कमळाबाई यांच्यावर निस्सीम प्रेम होते. जगन्नाथ जोशी हे कारागृहातून सुटावे यासाठी त्यांच्या आईने नरगुंदच्या जागृत दैवताला 'दीड काठीचा दंडवत' घालण्याचा नवस केला होता. (दीडकाठीचा दंडवत घालणारी व्यक्ती लोंटागण घालून हात पुढे करून जमीनीवर खूण करते. उठून तृया खुणेवर उभे राहून परत लोटांगण घालते आणि परत हात लांब करून खूण करते. असे करत करत मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करायची असते.) जगन्नाथ जोशी यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना आईने केलेल्या नवसाची गोष्ट समजली. हा नवस जगन्नाथ जोशी उन्हाळ्याच्या दिवसात यांनी 'दीड काठीचा दंडवत' घालत प्रदक्षिणा पूर्ण केली. खूप त्रास सहन करावा लागला. उघड्या अंगाने प्रदक्षिणा घालत असताना त्यांच्या आई त्यांच्यावर पाणी ओतत होत्या. उन्हामुळे होणारा आपल्या मुलाचा दाह कमी व्हावा यासाठी त्या मातेची धडपड होती. त्या आपला मुलगा दंडवत घालत असताना त्याच्या अंगावर पाणी टाकत होत्या. धर्मश्रद्ध माता आणि तिचा नवस पूर्ण करण्यासाठी शरीर कष्टविणारा तिचा पुत्र अशी ही विलक्षण जोडी.
या दोघांपैकी एकजण नास्तिक तर दुसरे आस्तिक होते. पण आपापल्या आईने केलेला नवस फेडण्यासाठी या दोघांनी केलेली कृती ही विलक्षण आहे. ती लक्षात राहण्यासारखी आहे.
सुधीर गाडे, पुणे
(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


श्री विकास दिवटे यांनी लिहिले आहे .
ReplyDeleteआजच्या काळात अपत्यांचे आपल्या आईवर किती प्रेम आहे हे माहित नाही. परंतु कोणतीही आई अपत्यावर ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निरपेक्ष भावनेने अमाप प्रेम करत असते. तिच्या बाळावर आलेली संकटे दुःख वेदना पाहून ती दुःखी कष्टी होत असते. असे निरपेक्ष प्रेम करणारे तेवढे एकच नाते. म्हणूनच म्हटले आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. भावनांना हात घालणारे खूपच सुंदर लेखन.👍👍🌹🌹
श्री. राजेंद्र जोशी यांनी लिहिले आहे.
ReplyDeleteधन्य त्या माता व ते पुत्र .
माता पित्यांची सेवा ही सर्व श्रेष्ठ सेवा आहे .
त्यांची महती अनेक जणांनी , अनेक वेळा सांगितली आहे .
शामची आई मधील एक हृद्य प्रसंग आठवला . आपल्या आईचे हृदय घेऊन जात असताना शामच्या पायाला ठेच लागली त्यावेळी त्या आईच्या हृदयातून विचारले गेले " लागले का रे बाळा ? " .
छान लेख