आईची शेवटची इच्छा
(कथा)
"मग करुयात ना पुढच्या महिन्यात लग्न?" निनादने विचारले आणि सागरिका एकदम थक्क झाली. थोडा वेळ तसाच शांततेत गेला. दोघेही एकमेकाकडे फक्त पाहत बसले. काही वेळाने सागरिका म्हणाली, "मी तुला दोन दिवसात सांगते." आतुरतेने तिच्या चेहऱ्याकडे पाहणारा निनाद थोडासा हिरमुसला पण शेवटी म्हणाला, "दोनच दिवस हं." नंतर दोघेही आपापल्या दिशेने चालू लागले.
(प्रसंगचित्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने) सागरिका आणि निनाद हे दोघे शिकत असल्यापासून बरोबर होते. बरोबर शिकत असताना मनाच्या तारा जुळल्या. हल्लीच्या भाषेत म्हणतात तशा व्हाइब्ज मॅच झाल्या. मग हळूहळू हे नातं अधिकच घट्ट होत गेलं. मनाची जवळीक वाढत गेली. दोघांनीही एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिली. शिक्षण पूर्ण करून दोघेही वेगवेगळ्या कंपनीत नोकरीलाही लागले. त्यालाही आता जेमतेम वर्ष होत आलं होतं.
बऱ्याच वेळा प्रेमी युगुलांच्यासमोर अडचण असते ती आपापल्या घरच्या माणसांच्या संमतीची, स्वीकाराची. पण निनाद आणि सागरिका याबाबत भाग्यवान ठरले. दोघांच्याही घरच्यांनी अगदी समजुतीने त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला. एकमेकांच्या घरी येणं जाणं अगदी मोकळेपणाने सुरू झालं. सणवार, निमित्ताने एकमेकांना भेटणं, एकत्र काही ठरवणं असं अगदी सुरळीत चाललं होतं. अगदी कुणाची दृष्ट लागू नये असं वाटावं इतकं सुरळीत. पण दृष्टच लागली म्हणायची. कुणा माणसाची नव्हे तर प्रकृतीची.
निनादच्या आईचं दुखणं सुरू झालं. त्यालाही आता दोन तीन महिने झाले होते. कसलीतरी किरकोळ लक्षणे दिसत आजारपण सुरू झालं. बघता बघता त्या आजारपणाने गंभीर स्वरूप धारण केले. शहरात राहत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एकामागून एक अशा तपासण्या सुरू झाल्या. नको नको त्या शंका मनात येऊ लागल्या. मागच्या आठवड्यात एखादा बॉंबगोळा आदळावा तसे तपासण्यांचे निष्कर्ष येऊन आदळले. निनादच्या आईला कर्करोग झाला होता.
एका डॉक्टरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहायला नको म्हणून दुसऱ्या एका प्रसिद्ध डॉक्टरा़चा सल्ला घेतला. पण म्हणतात ना वाईट बातमी खोटी ठरावी असं कितीही वाटलं तरी ती खरीच ठरते. कर्करोगाचं निदान अगदी बरोबर बरोबर होते.
बॉंब पडल्यानंतर आजबाजूचं सगळं काही उद्ध्वस्त करतो तसं निनादच्या घराचं सुख, समाधान, आनंद सगळं काही उद्ध्वस्त झालं. हा बॉंब काही साधासुधा नव्हता तर जणूकाही अणुबाँबच होता. कारण दोन्ही डॉक्टरांनी एकमताने हेदेखील सांगितले होतं की निनादच्या आईकडे आता फारतर चार सहा महिन्यांचंच आयुष्य उरलेलं होतं.
हा धक्का इतका तीव्र होता की घरात एकदम स्मशानशांतता पसरली. कुणालाही काही बोलावं , काही करावं असं वाटेना. तासनतास घरातली शांतता भंग होईना. कशाचाही आवाज येईना. अशातच दोन दिवस गेले. सगळ्यात आधी सावरली ती निनादची आई. आपण जाणार हे तिनं मनाशी स्वीकारलं. तिनं स्वीकारली तसं निनादचे बाबा आणि निनादनेही
स्वीकारले. दुसरा पर्याय तरी काय होता म्हणा? कुणाला काहीही वाटलं तरी परिस्थिती बदलणार थोडीच होती.
निनादच्या आईनं निरवानिरव करायला सुरुवात केली. घरात कुठं काय ठेवलंय, कुठल्या वस्तूचं काय करायचं कुणाला काय द्यायचं हे सगळं ती माऊली मनाचा हिय्या करून सांगू लागलं. निनाद आणि त्याचे बाबा नोकरी करुन उरलेला सगळा वेळ घरीच राहू लागले. जुन्या एकेका आठवणींची उजळणी होऊ लागली. कधी दु:खानं डोळे पाणावले तर कधी सुखानं पुसटसे हसू चेहऱ्यावर पसरलं. काय केलं, काय करायचं राहिलं याचीही उजळणी होऊ लागली.
कर्करोगाची बातमी जशी सागरिकाला कळली तशी तिच्या आईवडिलांनादेखील कळली. ते जवळपास रोज निनादच्या घरी येऊ लागले. या तिघांनाही बोलतं ठेवून मन थोडं हलकं होईल याचा प्रयत्न करू लागले. एक एक दिवस सरत होता तसतशी होणाऱ्या आघाताची तीव्रता सगळ्यांच्या मनाला जाणवू लागली होती.
निनादच्या आईकडे अजून काय बघायचं राहिलं, काय करायचं राहिलं याची उजळणी चालू होती तेव्हा एक गोष्ट मात्र सतत समोर येत होती ती म्हणजे निनाद आणि सागरिकाचं लग्न. हा विषय निघाला की निनादची आई काय बोलेल आणि कशी वागेल हे सांगता येणं कठीण झालं होतं. लग्नाचा विषय निघाला की कधीकधी ती लग्नात कायकाय करायचं कसंकसं करायचं याबद्दल भरभरून बोलायला लागयची. इतकी की आता पुरे असं म्हणायची पाळी यायची. पण कधीकधी हाच विषय निघाला की ती एकदम स्तब्ध व्हायची. तोंडातून एकही शब्द फुटायचा नाही. अर्धा तास, तास तसाच जायचा.
निनादला तर काही सुचतच नव्हते. आपली आई एवढ्या लवकर मरणार ही गोष्टच त्याला सहन होत नव्हती. कंपनीत गेल्यावर कामातही लक्ष लागत नव्हतं. मग साहेबाची बोलणी खावी लागत होती. पण कुठूनतरी कंपनीतही समजलं. सर्वांनाच खूप हळहळ वाटली. निनादचं काम तोपर्यंत अगदी चोख होतं. त्यामुळे सगळ्यांनीच त्याला समजून घ्यायचं ठरवलं.
घर, कंपनी, घर या धावपळीत दिवस पटकन संपून जाई. पण रात्री निनादला तासनतास झोप लागत नसे. या कुशीवरून त्या कुशीवर वळण्यातच वेळ जात राही. काय करू? काय करू? या विचारानं त्यांचं डोकं अगदी सुन्न होऊन जात असे. एका रात्री अगदी उशिरा त्याला झोप लागली. झोपेतच त्याला एक स्वप्न पडलं. ते स्वप्न होतं त्याच्या आणि सागरिकाच्या लग्नाच्या सोहळ्याचं. निनादच्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. मंगलाष्टका सुरू झाल्या होत्या आणि एकदम निनादच्या आई खाली कोसळल्या. "आई" असं मोठ्यानं ओरडत निनाद जागा झाला. घड्याळाकडं नजर गेली तेव्हा पहाटेचे पाच वाजत आले होते. निनादचा चेहरा घामाने डबडबलेला होता. निनादनं घाम पुसला.पाणी पिलं. तो विचार करु लागला.
त्याचं आणि सागरिकाचं प्रेम घरच्या़ंनी स्वीकारलं होतंच. आताच्या वहिवाटीनुसार लग्नाचीही काही घाई नव्हती. बघता येईल चार पाच वर्षांनी असंच त्याच्या मनात होतं. पण आता त्याच्या आयुष्यात एवढी उलथापालथ झाली होती की काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. शेवटी तासभरानं त्याचा निर्णय झाला की महिन्याभरात लग्न करण्याबाबत सागरिकाला विचारायचं. नव्हे नव्हे तिला तयार करायचं. आईची ही इच्छा तिच्या डोळ्यादेखत पूर्ण करायची.
त्याच दिवशी निमित्त काढून निनाद सागरिकाला घेऊन त्यांच्या नेहमीच्या हॉटेलात गेला. सागरिकाकडे त्यानं विषय काढला. तीही एकदम स्तब्ध झाली पण शेवटी "दोन दिवसात सांगते." असं म्हणाली. तिलाही लग्न करायला अजून पुष्कळ अवकाश आहे असंच वाटत होतं पण आता परिस्थिती एकदमच बदलली होती. या दोन दिवसात परत हा विषय काढायचा नाही आणि एकदम दोन दिवसांनीच या विषयावर बोलायचं असं ठरवून दोघंही आपापल्या घरी गेले.
हा हा म्हणता दोन दिवस सरले. निनाद आणि सागरिका परत त्या हॉटेलमध्ये भेटले. सागरिका काय म्हणते याची उत्सुकता निनादच्या चेहऱ्यावर अगदी दाटून आली होती. कधी एकदा सागरिका बोलतेय असं त्याला झालं होतं. शेवटी सागरिका म्हणाली, "करुया लग्न महिन्याभरात. " तिचं हे वाक्य ऐकलं आणि निनादला एकदम हलकं हलकं वाटलं. सागरिका पुढं सांगू लागली," हे बघ निनाद. आईंचं हे दुखणं उद्भवलं नसतं तर आपण चार पाच वर्षांनी लग्न करणार होतो. पण आता अशी परिस्थिती असल्याने लग्न लवकर करायचं आपण ठरवतोय. पण लग्न उशिरा का करायचं होतं तर लग्नापूर्वी मोकळिकीचा अनुभव आपल्याला घ्यायचा होता. तुझं आणि माझं प्रेम अगदी गहिरं असलं तरी काही गोष्टी नवरा बायको या नात्याने स्वीकारयला आपल्याला वेळ हवा होता. पण तेवढा वेळ आता आपल्याकडे नाही. तेव्हा लग्न जरी लगेच केलं तरी कायकाय आणि कसंकसं स्वीकारायचं हे आपण अगदी तपशीलवार ठरवलं पाहिजे. लहानसहान गोष्टीचा विचार केला पाहिजे." "अगदी बरोबर आहे तुझं, सागरिका! चल आताच बोलून ठरवू" निनाद म्हणाला. "अरे आता एवढा वेळ तुला घराबाहेर राहता येणार नाही. तेव्हा उद्या घरी सांगून ये. उद्या बोलू." सागरिका पुढे बोलू लागली. "मला अजून एक गोष्ट सुचली आहे. ती म्हणजे अशा परिस्थितीत कसं वागायचं, कसं जुळवून घ्यायचं याबाबत आपल्याला कुणातरी अनुभवी माणसाचा सल्ला हवा. शक्यतो व्यावसायिक माणसाचाच!" "म्हणजे कुणाचा?" निनादनं विचारलं. "अरे म्हणजे विवाह समुपदेशकाचा सल्ला हवा." सागरिकानं सांगितलं. निनादला लक्षात आलं की सागरिकानं या दोन दिवसात अगदी वेगवेगळ्या पद्धतीने विचार केलेला आहे. तोही म्हणाला, "अगदी बरोबर. आता मात्र आपण लगेच निघूया आणि उद्या पुन्हा भेटून बोलूया. आपलं सविस्तर बोलणं झालं की मग घरी सगळ्यांना सांगूया." सागरिकानंही मान डोलावली. दोघांचाही निश्चय पक्का झाला होता. तो होता 'आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा!'
सुधीर गाडे पुणे
(कथा आवडली तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)

Comments
Post a Comment