आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या अस्सल चित्राची गोष्ट

  

   ( चित्रकार श्री. रवी देव यांनी काढलेले चित्र म.ए.सो.च्या संकेतस्थळावरून साभार)

         'कथा दोन गणपतरावांची' नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे या ज्येष्ठ आणि इतर अभिनेत्यांनी यात काम केले आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी जे पात्र साकारले आहे ते गणपतराव स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व गोष्टींची नोंद ठेवत असतात. पण भारताच्या प्राचीन इतिहासाबाबत एक सर्वसाधारण विधान करायचे झाले तर आपल्याकडे इतिहासाच्या अचूक आणि तपशीलवार नोंदी फारशा आढळत नाहीत. त्यामुळे ऐतिहासिक सत्य काय याबाबत स्पष्ट भूमिका काही बाबतीत घेता येत नाही. ऐतिहासिक पुरावे, छायाचित्रे, इ. मिळवण्यासाठी खूप खटपट करावी लागते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत यांचे ऐतिहासिक छायाचित्र कसे मिळाले याची गोष्ट या लेखात दिली आहे.

     ऐतिहासिक नोंदी ठेवण्याबाबत इंग्रजांकडून शिकण्यासारखे आहे. यातील दोन अनुभव सांगतो. आमच्या म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय (१९७२पूर्वीचे म.ए.सो.कला आणि विज्ञान महाविद्यालय) आणि वसतिगृहाचे माजी विद्यार्थी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा.रमेश बापट यांनी एकदा भेटीत सांगितले की १६६२ मध्ये इंग्लडच्या राजाला मुंबई बेट विवाहप्रसंगी भेट म्हणून मिळाले. काही काळातच इंग्रजांनी तिथे आपले ठाणे उभारले. तेव्हापासूनचे काही महत्त्वाचे दस्तऐवज इंग्रजांनी अजूनही जपून ठेवले आहेत. दुसरे उदाहरण लंडननिवासी असलेल्या कै.वासुदेव शंकर गोडबोले यांनीदेखील एका प्रत्यक्ष भेटीत सांगितले होते. वासुदेव गोडबोले लंडनमधील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वास्तव्याच्या जागा , घटना , इतिहास यांचे अभ्यासक होते. क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांच्या मृत्यूनंतर सुमारे ७५ वर्षांनी त्यांचा दाखला ते ज्या महाविद्यालयात शिकत होते तिथून गोडबोले यांना मिळाला. असो.

       पूर्वीची पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूट्यूशन म्हणजे आजची महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे तीन संस्थापक. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री.वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर. यापैकी वासुदेव बळवंत फडके यांनी संस्थेच्या स्थापनेच्यावेळी खजिनदार म्हणून काम पाहिले. नंतर ते क्रांतिकार्यात उतरले. पण दुर्दैवाने त्यांना अपयश आले. फितुरीमुळे त्यांचा घात झाला. त्यांना पकडण्यात आले. पुण्यात खटल्याचे नाटक करून दोषी ठरवण्यात आले. भारतापासून हजारो किलोमीटर दूर आजच्या येमेनमध्ये एडनच्या कारागृहात ठेवण्यात आले. तिथून निसटण्याचा प्रयत्न फडके यांनी केला. पण तो अपयशी ठरला. एडनच्या कारागृहातच त्यांचा मृत्यू झाला. 

      २०२० हे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्ष होते. याकाळात संस्थेने विविध उपक्रम योजले होते. त्यातील एक बाब होती ती म्हणजे संस्थापकांची अस्सल चित्रे काढून घेणे. वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांच्या वंशजांशी संपर्क साधून त्यांच्याकडील छायाचित्रे मिळाली. पण वासुदेव बळवंत फडके यांच्या अस्सल छायाचित्र मिळण्याचा प्रश्न उभा राहिला. वासुदेव बळवंत फडके यांचे बंदूकधारी चित्र साधारपणे तोपर्यंत सगळीकडे प्रचलित होते.

     शतकोत्तर हीरकमहोत्सवी वर्षाचा अजून एक उपक्रम म्हणजे संस्थेचा इतिहास ग्रंथ रूपाने लिहून प्रसिद्ध करणे. संस्थेच्या आजीव सभासद आणि मराठी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. केतकी मोडक या अन्य अनेकांच्या मदतीने ग्रंथलेखनाचे काम करत होत्या. या ग्रंथलेखनाच्यासाठी पुण्यातील अनेक तज्ज्ञ व्यक्तिंचे सहाय्य त्या घेत होत्या. यातच एकजण मदतीला आले ते म्हणजे इतिहासाचे अभ्यासक श्री.मंदार लवाटे. श्री. लवाटे हे म.ए.सो. मुलांचे विद्यालय (भावे हायस्कूल) याचे माजी विद्यार्थी. त्यांच्याशी याबाबत चर्चा झाली. त्यात त्यांनी अनेक मुद्दे सांगितले. छायाचित्राच्या बाबतीत श्री. लवाटे यांनी सांगितले की पुण्यात सोमवारपेठेत राहणारे श्री विष्णुपंत काळे यांच्याकडे वासुदेव बळवंत फडके यांचे अस्सल छायाचित्र आहे. वासुदेव बळवंत फडके यांना पकडून पुण्यात आणण्यात आले तेव्हा हे छायाचित्र घेण्यात आले होते. वासुदेव बळवंत फडके यांच्या बंदूकधारी चित्राबद्दल ते मूळ छायाचित्रावरून न काढता कल्पनेने काढले असावे असे श्री. लवाटे यांचे मत आहे.

        मी १९९५-९७ याकाळात मंगळवारपेठेत राहत असे. तिथला संघ स्वयंसेवक श्री. धनंजय सुधाकर काळे याच्याशी माझी तेव्हापासून ओळख होती. मी लगेच धनंजयला फोन करून विचारले. तेव्हा धनंजय म्हणाला, " विष्णुपंत काळे हे माझे चुलत आजोबा. पण दुर्दैवाने कालच त्यांचे निधन झाले. दिवसकार्य झाल्यावर घरात बोलून मग छायाचित्र देतो."

  (कै. विष्णुपंत काळे यांचे छायाचित्र काळे कुटुंबियांच्या सौजन्याने)

    कै. विष्णुपंत काळे हे चिंचवडमध्ये एल्प्रो या कंपनीत कामाला होते. त्यांना इतिहासाची, सामाजिक विषयांची खूप आवड होती. पुण्यातील वेगवेगळ्या तज्ज्ञ, अभ्यासक व्यक्तिंना भेटून चर्चा करणे. जागरुकपणे विविध विषयांवर मत मांडणे , 'वादे वादे जायते तत्वबोध:' या उक्तीप्रमाणे वाद करणे असा त्यांचा परिपाठ होता. याचबरोबर विविध ऐतिहासिक गोष्टींचा ते संग्रह करत असत. श्री. लवाटे यांनी एका वृत्तपत्रात गणेशोत्सवावर एक लेख बऱ्याच वर्षांपूर्वी लिहिला होता. त्या लेखाला दिलेल्या प्रतिसादातून कै. विष्णुपंत काळे आणि श्री. मंदार लवाटे यांचा परिचय भेट झाली होती. त्यातून काळे यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक गोष्टींच्या संग्रहाची माहिती श्री. लवाटे यांना झाली होती. 

      कै. विष्णुपंत काळे यांचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांनी उत्तरायुष्यात आपल्या पत्नीच्या मदतीने काही वर्षे अगदी‌ लहान मुलांसाठीचे पाळणाघर चालवले होते. यातून पैसे मिळावेत हा हेतू नव्हता पण नोकरी करणाऱ्या महिलांची सोय व्हावी या उद्देशाने नाममात्र शुल्क घेऊन हे काम पतीपत्नी करत असत.

    कै. विष्णुपंत काळे यांचे दिवसकार्य संपल्यानंतर काळे कुटुंबियांनी अस्सल छायाचित्र काही दिवस म.ए.सो.कडे दिले. पुण्यातील प्रसिद्ध चित्रकार श्री. रवी देव यांनी त्यावरून वासुदेव बळवंत फडके यांचे चित्र काढले. श्री. देव यांनी श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांचीही चित्रे काढली. हीच तीन चित्रे गेल्या ५-६ वर्षांपासून म.ए.सो.मध्ये प्रमाण म्हणून वापरली जातात.

सुधीर गाडे पुणे 

(लेख आवडला तर कृपया पुढे पाठवा. त्यासाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.)


Comments



  1. एकूणच, एका सामान्य नोकरदार माणसातील असामान्य इतिहासप्रेमी आणि सामाजिक संवेदनशीलता असलेला माणूस या लेखातून समोर येतो.🙏

    ReplyDelete


  2. एकूणच, एका सामान्य नोकरदार माणसातील असामान्य इतिहासप्रेमी आणि सामाजिक संवेदनशीलता असलेला माणूस या लेखातून समोर येतो.🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सामाजिक जाणिवेतून कृती करणाऱ्या व्यक्तिंची आनंददायक भेट

आनंद देणाऱ्या वसतिगृहाच्या आठवणी

स्वामी विवेकानंद यांचे जीवन सांगण्याचा अजून एक प्रयत्न